yuva MAharashtra कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न


| सांगली समाचार वृत्त |
कडेगाव - दि. १७ जुलै २०२४
सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा हजारों भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात संपन्न झाला. हा भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते. विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती.

सांगली जिल्ह्यातील कडेगावात गेली 150 वर्षांपासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजही ही परंपरा चालू वर्षीच्या मोहरम सणात दिसून आली.

बुधवार (दि 17) सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत-गाजत आणण्यात आले. त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी 11 वाजता मानाचा सात भाई ताबूत उचलण्यात आला. येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला. हा ताबूत विजबोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले.


त्यानंतर बागवान , आत्तार, शेटे आणि अन्य उंच ताबूत माना प्रमाणे उचलण्यात आले. त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला. आणि सातभाई-पाटील-बागवान-अत्तार-हकीम, देशपांडे या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी 11.30 वाजता संपन्न झाल्या.

या भेटी म्हणजे राम-भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या उंचावून त्यांचे स्वागत केले. भेटी सोहळ्याचा आनंद लुटला. त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) कडे निघाले. यावेळी इमाम हुसेन झिंदाबाद, मौला अली झिंदाबाद, धुला.. धूला आशा घोषणा देण्यात येत होत्या. दरम्यान वाटेत तांबोळी व अन्य ताबूत सहभागी झाले. त्यानंतर माईनकर यांचा उंच ताबूत उचलण्यात आला.

मानकऱ्यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले. सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेश बाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) या ठिकाणी एकत्रित केले गेले. त्या ठिकाणी मेलवाल्याकडून "महान भारत देश अमुचा घुमवू जय जयकर","तसेच प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा' 'हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे" अशी ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली. त्यानंतर हिंदू मानकऱ्यामार्फत मसूद माता ताबूत पंजे, बारा इमाम पंजे मानकऱ्यामार्फत आणण्यात, आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला. या ठिकाणी माना प्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले. दुपारी 2.30 वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसले.

यावेळी माजी आमदार मोहनराव कदम, माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, युवा नेते जितेश कदम, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व ताबूत मालक व मानकरी, शुक्रवार पेठ व बुधवार पेठ मेलचे मानकरी, करबलचे मानकरी, मसूद माता, बारा इमामा पंजेचे मानकरी यांच्यासह भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.