Sangli Samachar

The Janshakti News

आमदारकीचे डोहाळे लागलेल्या पृथ्वीराज पवार यांना जयंत पाटील या नावाची कावीळ - सचिन जगदाळे

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ जुलै २०२४
आमदारकीचे डोहाळे लागलेल्या पृथ्वीराज पवार यांना जयंत पाटील या नावाची कावीळ झाली आहे. आजवर ज्यांना एखाद्या महापालिका प्रभागातून निवडणूक लढविण्याचे धाडस झाले नाही, जे जयंत पाटील साहेब यांच्यामुळे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक झाले. त्या पृथ्वीराज पवार यांनी जयंत पाटील यांना स्वयंघोषित नेता म्हणणे हे पोरकटपणा चे लक्षण आहे. असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सांगली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन जगदाळे यांनी केला. भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी काल जयंत पाटील यांच्यावर " माझं ते माझं तुझं तेही माझंच" अशी वृत्ती असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना जगदाळे बोलत होते.


यावेळी बोलताना जगदाळे पुढे म्हणाले की जयंत पाटील यांच्या विकासात्मक कार्य कर्तृत्वाबाबत केवळ वाळवा तालुक्यातीलच नव्हे, तर राज्यातील सर्वसामान्य जनता चांगली जाणून आहे. त्यामुळेच सलग सात वेळा तब्बल ७५ हजार हून अधिक मताधिक्यानी निवडून येतात. सांगलीकरांच्या विविध प्रश्नांबाबत पृथ्वीराज पवार आज जे बोलतात, त्या प्रश्नांची सोडवणूक तुमच्या घरात २० वर्षे आमदारकी असताना का केली नाही. त्यावेळी सांगलीकरांच्या या प्रश्नांची तुम्हाला आठवण झाली नाही का ? असा प्रश्न करून जगदाळे म्हणाले की, सांगली महापालिका क्षेत्रातील फेरीवाले, हातगाडीवाले, हमाल व कष्टकरी बांधवांच्या किती प्रश्नांची आपण सोडवणूक केली ? केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अन आंदोलन करण्यापुरतेच या वर्गाचा पुरेपूर वापर केला. केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी प्रत्येक गोष्टीत ओढून- ताणून जयंत पाटील यांचे नाव जोडून स्वतःच्या नेत्यांच्या गुडबुक मध्ये जाण्यासाठी धडपड करण्यापेक्षा प्रामाणिकपणे सांगलीकरांच्या प्रश्नांची सोडवणूक करून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे. असे आव्हान जगदाळे यांनी पृथ्वीराज पवार यांना केले .

यावेळी माजी नगरसेवक हरिदास पाटिल, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष समीर कुपवाडे, सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव गॅब्रिएल भाऊ तिवडे, सेवादल शहर जिल्हाअध्यक्ष महालिंग हेगडे आदी उपस्थित होते.