Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील सभांचा 'तो' साक्षीदार थकला !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ जुलै २०२४
आज बऱ्याच दिवसांनी सांगली शहरातील नेत्यांच्या सभांचा साक्षीदार ठरलेल्या स्टेशन चौकाला भेट दिली. आता हे सभास्थळ थकले आहे. पूर्वी सांगली मिरज मीटरगेज रेल्वे असताना इथे रेल्वे स्टेशन होते. हा परिसर नेहमी गर्दीने फुलेला असे. याच स्टेजच्यासमोर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांचे दोन आकर्षक पुतळे आजही तितक्याच दिमाखात उभे आहेत. पंडित नेहरू यांच्या पुतळ्यासमोर फारसे आंदोलने होत नाहीत. परंतु महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मात्र आजही आंदोलन होतात. भीम गर्जना होते. आणि आता कदाचित तत्कालीन सभांची आणि आजच्या सभांची तुलना हे पुतळेही करत असतील का ? असो. आज या पुतळ्यांच्या जोडीला, पश्चिमेस वसंतदादा आणि राजारामबापू या एकेकाळच्या राजकीय विरोधकांचे पुतळे शेजारी शेजारी उभे आहेत.

मी आणि माझा मित्र अशोक बाबर ७७ ते ८० या काळात सांगलीच्या कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात शिकत होतो. 'आज सांगलीतील स्टेशन चौकात अमुक अमुक यांची सभा होणार आहे !' असा रिक्षातील आवाजी प्रचार ऐकला, की आम्हा मित्रांचे टोळके साडेसात वाजता चौकात दाखल होई. सभास्थानी उंच बांधकाम असलेल्या व्यासपीठावर, ज्या पक्षाची सभा असे त्या पक्ष्याचे झेंडे फडकत असत. मोठ्या लॅम्पमुळे प्रकाश सर्वदूर पसरे. चहा, सोडा यांच्या छोट्या गाड्यावरील बत्त्यांमुळे प्रकाश योजना पुरी होई. 


श्रोत्यांसाठी बऱ्याच वेळा भारतीय बैठक असे. भटकी कुत्री येथे हमखास हजेरी लावत. वक्ते त्यावरही 'कोटी' करीत. त्या काळात राष्ट्रशक्ती हे वृत्तपत्र सभांचे सविस्तर वृत्त देई. आम्ही खासदार जगन्नाथ जोशी, बापूसाहेब काळदाते, मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, वसंतदादा, राजारामबापू, संभाजी पवार, आण्णा डांगे या नेत्यांच्या सभा या गर्दीने ओसांडणाऱ्या चौकात ऐकल्या. 

आमचे खरे आकर्षण होते, भाई ताराचंद शहा आणि हिंदू एकताचे नारायण कदम या दोघांची आक्रमक भाषणे आम्हाला प्रचंड आवडायची. अर्थात ते दिवस उत्सुकता, उत्साह, कुतूहालाचे होते. ज्या दिवशी ज्याची सभा होईल, तो त्या दिवशी शंभर टक्के बरोबर असं वाटण्याचा तो पौगंडावस्थेतील काळ होता. 

बऱ्याच दिवसांनी आज हे सभा स्थळ पाहिलं. उंच व्यासपीठाचा रंग उडाला आहे. आता या स्टेजवर फारशा सभा होत नाहीत. त्यामुळे या स्टेजने एका निराश्रीताला आश्रय दिला आहे. स्टेजच्या भिंतीवर अनेक व्यवसायाचे स्टिकर चिटकवले जातात. सभांचा साक्षीदार असलेल्या या स्टेजचं 'ते' वैभव आता राहिले नाही. सध्या ते अतिशय भकास वाटतं. काळाच्या ओघात आता आमच्या बरोबर हा सभांचा साक्षीदारही थकला म्हणायचा !

आता त्याच्यासमोरच भव्य दिव्य, फुलांनी सजलेलं, लाईटचा झगमगाट असलेलं व्यासपीठ उभारलं जातं. त्यावरून केलेली भाषणे ऐकत असताना, या स्टेजलाही कधीकाळी 'आपण सांगलीचे वैभव होतो' असं वाटत असावं का हो ? जाऊदे... एखादी वस्तू असो, वास्तू असो किंवा मग मनुष्य जुना झाला की त्याचं महत्त्व कमी होतं असं म्हणतात... हे ऐतिहासिक सभांचे ऐकेकाळचं वैभव त्यापैकीच एक

प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर.