yuva MAharashtra नांदणीमध्ये प. पु. आचार्य विशुद्धसागरजी महाराज यांचे मंगल आगमन !

नांदणीमध्ये प. पु. आचार्य विशुद्धसागरजी महाराज यांचे मंगल आगमन !



| सांगली समाचार वृत्त |
नांदणी - दि. १५ जुलै २०२४
चर्याशिरोमणी आचार्य प. पु. विशुद्धसागरजी महाराज यांचे नांदणी मध्ये शुभ आगमन झाले. यावेळी त्यांना स्वाभिमानी औद्योगिक वसाहत येथून मिरवणुकीने नांदणी येथील गांधी चौकामध्ये आणण्यात आले. यावेळी श्रावक श्राविकांनी उस्फूर्त स्वागत करून प. पु. आचार्य यांचा जयजयकार केला.

यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, राजू शेट्टी, उत्तम पाटील (बोरगाव), दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंड पाटील, भालचंद्र पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष दक्षिण भारत जैन सभा, आप्पासाहेब लाडगोंडा पाटील कर्नाटक हे उपस्थित होते.


स्वस्तिश्री जिनसेन भटारक महास्वामी व मान्यवरांच्या उपस्थितीत प. पु. आचार्य विशुद्धसागरजी महाराज यांचे पादपूजा करण्यात आली. मुनी महाराज यांच्या संघात 26 मुनी आहेत. नांदणीच्या मुख्य मार्गावरून या सर्वांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये बँड लेझीम, झांज पथक, हलगी, तुतारी अशा विविध प्रकारच्या वाद्यांचा समावेश होता. यावेळी संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातील तसेच संपूर्ण भारतामधील विविध राज्यातील श्रावक श्राविका हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे पाठशाळा, विविध हायस्कूलचे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच हत्ती, घोडे, रथ, बैलगाडी यांचाही समावेश होता.

प. पु. आचार्यश्रींच्या आगमनाप्रित्यर्थ संपूर्ण नांदणी गावात बॅनर, रांगोळी, स्वागत कमानी उभ्या करून प्रत्येक चौका चौकात पादपूजा करण्यात आली. तसेच पुष्पवृष्टी करून मुनी संघाचे स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये जैन समाजाबरोबरच मुस्लिम, मराठा, बौद्ध, धनगर, वारकरी अशा सर्व समाजातील लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. 


आचार्यश्रींचे मिरवणूक नांदणी गावांमध्ये फिरून श्री अतिशय क्षेत्र वृषभांचल येथे संपन्न झाला. त्यानंतर प. पु. मुनी महाराज विशुद्धसागर यांचे प्रवचन झाले. प्रवचनावेळी त्यांनी नांदणी गावाचा उल्लेख नंदनगाव असा करून अनेक विविधतेने नटलेले हे गाव आहे, असे सांगून स्वस्तिश्री जिनसेन भट्टारकांबद्दल गौरवोद्गार काढताना, प. पु. स्वामीजींनी म्हटले की, हे जिनसेन पिठावरील शंभरावे भट्टारक असून, या पिठावर बसणाऱ्या भटारकांमध्ये यांनी फार महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. 

नांदणीतील हा चातुर्मास फक्त येथील लोकांचा नसून 700 गावातील सर्व समाजांनी मिळून केलेला आहे. पूर्वी दक्षिणेकडील मुनी संघ उत्तरेकडे प्रभाव होण्यासाठी जात होते. पण आज आमचा संघ उत्तरेकडून दक्षिणेकडे आला आहे, असे सांगून आचार्यांनी पुढे म्हटले की. वृषभनाथांपासून भ. महावीरांच्यापर्यंत, सर्व तीर्थंकर, प्रथम आचार्य शांतीसागर महाराजांपासून आजपर्यंतच्या सर्वच आचार्यांपर्यंत सर्वत्र मंगल ही मंगल आहे. वार कोणताही असो रविवार ते शनिवार सर्व दिवस मंगलमय्याच असतात. आणि हा संपूर्ण चातुर्मास सर्वांच्यामुळे मंगलमय संपन्न होईल. भाषा, भोजन यांच्यामध्ये भिन्नता असेल, पण भक्तीमध्ये भिन्नता असत नाही. त्यामुळे विश्वशांती व विश्वकल्याण होईल असे गौरवोद्गार आचार्य विशुद्धसागर महाराजांनी आपल्या प्रवचनांमध्ये काढले.

सुरुवातीला स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य यांनी सर्वांचे स्वागत करून मुनी संघाला इथपर्यंत कसे आगमन झाले याचे वर्णन करून, गुरुदेवांविषयी गौरव करताना, सर्वांच्या सहयोगाने हा चातुर्मास निर्विघ्नपणे संपन्न होईल असा विश्वास व्यक्त केला. हे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. आप्पा भगाटे, सागर संभूशेटे, चंद्रकांत धुळा सावंत, संजय बोरगावे, रामगोंडा पाटील, अण्णा तत्वे, जिनेश्वर जुगळे, अविनाश पाटील ई लोकांनी विशेष परिश्रम घेतले.