| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ जुलै २०२४
महाराष्ट्रातील गड किल्ले हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा. परंतु गेल्या काही वर्षात हे गड किल्ले शासनाची उदासीन भूमिका तसेच अतिक्रमण आणि हुल्लडबाज पर्यटकांमुळे बकाल बनत चालले होते. जिथे महाराजांच्या मावळ्यांनी इतिहास घडविला, तिथेच मद्यप्राशन करून या गडकिल्ल्यांना कचराकुंडी करून ठेवले होते. यामुळे छत्रपतींवर प्रेम करणारा आजचा मावळा नाराज होत होता. गड किल्ल्यावरील अतिक्रमण आणि हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्याची मागणी सातत्याने होत होती.
या पार्श्वभूमीवर प्रथम प्रतापगड आणि त्यानंतर विशाळगड येथील अतिक्रमण आणि गैरप्रकारावरून संतप्त हिंदुत्ववादी संघटनांनी राज्य शासनाला अल्टिमेटम दिला होता. त्याला जोड मिळाली ती कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे. अतिक्रमण हटवण्याच्या भूमिकेवर ठाम रहात त्यांनी विशाळगड गाठला. आणि न्यायप्रविष्ठ असलेल्या बांधकामा व्यतिरिक्त येथील इतर अतिक्रमण तात्काळ हटवावे, अन्यथा आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल. असे शासनाला ठणकावून सांगितले.
याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर थेट कोल्हापूर गाठले. रात्री एक वाजता त्यांनी पोलीस आयुक्त आणि प्रशासनाची भेट घेऊन याबाबत संपूर्ण माहिती घेतली. कालच एकनाथ शिंदे यांनी 'गड किल्ल्यांबाबत आमच्याही मनात आदर असल्याचे' सांगून, याबाबत सूतोवाच केले होते. आणि या भेटीनंतरच चाव्या फिरल्या.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना आगामी काळात राज्यातील कोणत्याही गड किल्ल्यावर व पवित्र स्थळावर मद्यप्राशन करून येणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, तसेच राज्यातील सर्व गड किल्ल्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात येईल. यासाठी राज्यात कायदा बदल हे घडवून आणले जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी गडकिल्ल्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सुधीर मुनगट्टीवार यांनी यावेळी दिली. जिथे गड किल्ल्यावर अतिक्रमण केले आहे, त्यांनी सामोपचाऱ्याने सांगून ऐकले नाही, तर कायद्याच्या भाषेत उत्तर दिले जाईल, असे मुनगट्टीवर म्हणाले.
दरम्यान राज्य शासनाने गड किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या भूमिकेमुळे हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु ही मोहीम केवळ दिखाव्यापुरती न राहता, यामध्ये सातत्य राखण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षाही नागरिकांतून व्यक्त करण्यात आली आहे.