| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २१ जुलै २०२४
गुरु पौर्णिमा
----------------
"गुरु पौर्णिमा" म्हणजे आपण वर्षभरात गुरुच्या सानिध्यात राहून जे ज्ञान प्राप्त केले त्याचे अनुकरण करून, आपली सेवा गुरूचरणी अर्पण करण्याचा व गुरुच्या कृपा आशिर्वादास पात्र राहण्याचा दिवस !
गुरू होण्यासाठी वयाची, शिक्षणाची काही अट नसते. जो तुम्हाला अज्ञानाच्या अंध:कारापासून ज्ञानाच्या प्रकाशाकडे सहजपणे घेऊन जातो तोच तुमचा गुरु असतो!
पहिली गुरू आपली आई.
"आई माझा गुरु, आई कल्पतरू
भव सिंधूचा तारू, आई माझी!"
नंतर वडील. आपले मित्र. शाळेतील शिक्षक. नोकरीतील व्यवसायातील सहकारी. एखाद्या प्रसंगात एखादं लहान मूल सुद्धा आपल्या गुरुची भूमिका वठवते.
भक्ती पंथात आपण जेव्हा गुरुच्या शोधात असतो त्यावेळी गुरुची "योग्य" निवड कशी करावी याविषयी शेगावचे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज म्हणतात,
"गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शास्त्र चिंतामणी,
गुरु असावा परमगुणी, भक्तिपंथासी दाविता!"
भक्त व परमेश्वर यामधील दुवा म्हणजे गुरु!
सध्या जी मंडळी ज्येष्ठ नागरिक म्हणवतात त्यांना संगणकाचे ज्ञान देणारी जी तरुण पिढी आहे ते त्यांचे गुरुच आहेत !
आपल्याला ड्रायव्हिंग शिकवणारा, ट्रॅफिकचे नियम समजावून सांगणारा, "कचरा" कचराकुंडीतच टाका म्हणून सांगणारा, "थुंकू नका" म्हणून सांगणारा हे सगळे आपले गुरुच आहेत! त्यामुळे प्रसंगोपात ज्यांच्याकडून ज्ञान मिळते त्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस !
महर्षी व्यासांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला. व्यास महर्षींनी वेदांचे व्यवस्थापन केले. प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले. ज्ञानाची व्यवस्था केली. म्हणून गुरुपौर्णिमेला "व्यासपौर्णिमा" असेही म्हणतात ! प्रत्येक विषयाचे ज्ञान अधिकृत ग्रंथातून आत्मसात करून, त्याचे आचरण करून अनुभव घेतल्यानंतरच, जनकल्याणार्थ ते ज्ञान लोकांना सांगतो तो "आचार्य"
ज्या उच्चस्थानी बसून व्यासांनी हे ज्ञान सांगितले ती जागा, ते स्थान म्हणजे "व्यासपीठ"
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः!
आपल्याला जीवनात यशाचा मार्ग दाखवतात ते गुरु. म्हणून आपण त्यांच्याविषयी गुरुपौर्णिमेला कृतज्ञता व्यक्त करतो. श्रीराम व श्रीकृष्ण या अवतारी पुरुषांना (ते सर्वज्ञ असूनही) वसिष्ठ व सांदिपनी हे अनुक्रमे त्यांचे गुरु होते !
मनुष्य प्राणी हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. आयुष्यात येणाऱ्या भल्या बुऱ्या प्रसंगातूनही तो शिकत असतो. संकटे टळतात तेव्हा ती "गुरुकृपा" होते ! गुरुला शिष्यांशिवाय गुरुत्व येत नाही. नुसतेच ज्ञान असून उपयोग नाही, तर ते ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झाले पाहिजे, त्याशिवाय गुरुला मुक्ती नाही !
गुरु विण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान,
जीवन भवसागर तराया,
चला वंदू गुरुराया !
जयंत शंकर कुलकर्णी
९४२३५३४१५६