| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ जुलै २०२४
सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विधानसभेवर आपलाच झेंडा लागावा म्हणून महायुती आणि महाआघाडीमध्ये कांटे की टक्कर होणार आहे. दोन्ही बाजूंकडून तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी आतापासूनच सुरू झाले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच सांगली विधानसभा मतदारसंघ हे सध्या राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने येथे मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षामध्ये चैतन्याचे वारे आहे. अशातच सांगली विधानसभा मतदारसंघातून विशालदादा पाटील यांना मिळालेली मते येथील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील आणि कार्यकर्त्यांचे मनोबळ चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे.
गत दोन विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या सुधीर दादा गाडगीळ यांनी विजय संपादन केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही त्यांच्यासाठी हॅट्रिक ठरवणार असा चंग भाजपच्या कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे. सुधीर दादा गाडगीळ यांची स्वच्छ प्रतिमा. गेल्या दहा वर्षात विकास कामांचा त्यांनी उभा केलेला विकास कामांचा डोंगर. आणि सांगली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी त्यांची असलेली जवळीक त्याचप्रमाणे येथे असणारी संघाची बलाढ्य ताकद ही सुधीर दादांची बलस्थाने आहेत.
तर गत निवडणुकीत थोडक्यात फरकाने काँग्रेसच्या पृथ्वीराज बाबा पाटील यांना अपयश वाचवावे लागले होते. परंतु या अपयशाने खचून न जाता, राखेतून उडान घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघात विविध सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमातून नाव चर्चेत ठेवले आहे. त्याचप्रमाणे जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आंदोलने करीत पृथ्वीराज बाबा पाटील यांनी जनतेची मिळवलेली सहानुभूती ही पृथ्वीराज बाबांची जमेची बाजू.
विशेषतः श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू समाजाची बलस्थाने. आणि हीच बलस्थाने काबीज करण्याचे कार्य पृथ्वीराज बाबांनी गेल्या पाच वर्षात केलेले आहे. प्रतिवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, शिवराज्याभिषेक यानिमित्ताने पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने या ठिकाणी अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पृथ्वीराज बाबा फाउंडेशनने निर्माण केलेली 'अखंड ज्योत' आणि अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये त उभारलेले प्रति श्रीराम मंदिर हा चर्चेचा विषय ठरलेला होता. त्यामुळे सुधीर दादा गाडगीळ यांच्या तुलनेत पृथ्वीराज बाबा पाटील यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत विशाल दादा पाटील यांच्या विजयात 'पश्चिमेकडील स्पीड ब्रेकर' या विधानसभा निवडणुकीतही गत दोन वयाच्या निवडणुकीप्रमाणे चांगलाच अडचणीचा ठरणार आहे. परंतु विशाल दादा पाटील यांचे संकटमोचक ठरलेले व जिल्ह्यात सध्या राजकीय वर्चस्व निर्माण केलेले माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पृथ्वीराज बाबा पाटील यांना तयारीला लागण्याचे दिलेले आदेश सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देणारी आहे.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी सांगली विधान मतदार संघातील निवडणूक केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी राहणार आहे हे नक्की.