Sangli Samachar

The Janshakti News

...तर, रेल्वे कार्यालयावर चाबूक मोर्चा काढणार - नितीन राजे शिंदे कडाडले !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ जुलै २०२४
मिरज पुणे रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण व दुहेरीकरणाचे मार्ग वेगाने सुरू असून या मार्गावर असलेल्या गेट बंद करून नागरिकांच्या सोयीसाठी उड्डाण पूल बांधण्याचे काम रेल्वे विभागाकडून हाती घेण्यात येत आहे. भविष्यातील या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असली तरी, कासव गतीने होणाऱ्या कामामुळे, वर्तमानात नागरिकांचे प्रचंड हाल होतात. चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपूल हे याचे उत्तम उदाहरण.

सांगली मिरज मार्गावरील कृपामयीजवळील रेल्वे पूल धोकादायक स्थितीत असल्याने, तो नव्याने बांधण्याचा घाट रेल्वे विभागाकडून घालण्यात येत आहे. हे काम अजून सुरू होत नाही तोच, पलूसकडे जाणाऱ्या मार्गावरील वसगडे नजीकच्या गेटजवळ उड्डाणपूल बांधण्याच्या हालचाली रेल्वे विभागाकडून सुरू आहेत. संभावित रेल्वे पुलामुळे या मार्गावरून जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाणा-या वाहनधारकांचा फेरा वाढणार असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

आणि म्हणूनच नागरिकांच्या संतापाला माजी आमदार नितीन राजे शिंदे यांनी वाट मोकळी करून दिली आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना, नितीन राजे शिंदे म्हणाले की, चिंतामणी नगरच्या पुलाचे काम रखडले असल्याने सांगलीची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे आता हा पूल पूर्ण व्हायच्या आतच इतर पुलांची कामे सुरू करून सांगलीचा संपर्क तोडला जात आहे. त्यामुळे नागरिकांचा छळ चालू आहे. 31 जुलै पर्यंत चिंतामणी नगर येथील रेल्वे उड्डाणपूल पूर्ण झाला नाही तर रेल्वे अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर चाबूक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नितीन राजे शिंदे यांनी यावेळी दिला.

चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलाला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आले आहे. हा मार्ग बंद असल्याने व्यापारी व उद्योजकांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. सध्या विधानसभेचे अधिवेशन चालू असूनही लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवत नाहीत.

चिंतामणी नगरच्या पुलावरून जाणारा हा राज्यमार्ग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या मार्गावरून विटा आटपाडी पर्यंतचे लोक हे जा करीत असतात. या नागरिकांना चार किलोमीटरचा वळसा घालून सांगलीत यावं लागतं. त्यात बरीच भर म्हणून आता व सगळ्याजवळ पूल बांधण्यात येत आहे. याकरिता हा मार्ग एक महिना बंद करण्यात येणार आहे. 

म्हणजे पंचशील नगर मधून बायपासला येणाऱ्या रस्त्यावर मुलाच्या बांधकामासाठी तो मार्ग बंद करण्याच्या नादात प्रशासन आहे म्हणजे पंचशील नगरचा रस्ता बंद, वसगडेचा रस्ता बंद, सांगली ते पेठ नाका या रस्त्याचे काम सुरू आहे त्या रस्त्यावर लोक जायला तयार नाहीत. या मार्गावरून वाहतूक करताना होणारा त्रास टाळण्यासाठी नागरिक व वसगडे मार्गाचा पर्यायी रस्ता म्हणून स्वीकारला आहे येथून कराडकडे जाण्यास हा मार्ग सोयीचा आहे. परंतु आता तोही बंद होत आहे.

कोरोना आणि महापुरामुळे सांगलीची व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात आता हे सर्व पूड एकाच वेळी बांधायला काढले तर सांगलीची बाजारपेठ पूर्णपणे उध्वस्त होऊन जाईल. त्यामुळे पहिल्यांदा चिंतामण नगरचा रेल्वे उड्डाणपूल 31 जुलै पर्यंत पूर्ण करा, आणि मगच बाकीचे रस्ते बंद करायचे असतील तर ते करा. आमचे ऐकले नाही आणि बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू केला तर ते बांधकाम आम्ही बंद पाडू जनतेला घेऊन त्या भागातल्या नागरिकांना एकत्र करून आंदोलन केले जाईल. 

ठेकेदाराने मुदतीत काम केले नाही म्हणून किती दंड केला ? त्याला मुदत वाढ का दिली ? आणि मुदतवाढ दिल्यानंतरही पंचशील नगर मार्गावरील जो मृत्यूचा सापळा आहे, तिथं जर एखादा रेल्वे अपघात घडला तर याला संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी असेल.


वास्तविक सांगली जिल्ह्यातले बरेच आमदार या मार्गावरून जातात. त्यांनी हा प्रश्न सहभागात उपस्थित करून आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्यावर चर्चा घडवून आणावी. चिंतामण नगरीत उड्डाणपुलाचे बांधकाम रखडल्याने व्यापाऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याबाबत नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. हा उड्डाणपूल रखडण्यासाठी जो ठेकेदार जबाबदार आहे त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे, अशा मागण्या नितीन राजे शिंदे यांनी यावेळी केल्या.

यावेळी बोलताना माधवनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप बोथरा म्हणाले की सांगली सर्व लोकप्रतिनिधी व समाजसेवी संस्था यांचे लक्ष आम्ही या प्रश्नाकडे वेदण्याचा प्रयत्न करतो आहोत. परंतु दुर्दैवाने अजूनही हा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नाही. हा उड्डाणपूल पूर्ण करण्यासाठी 14 जानेवारी हे डेडलाईन होते ती संपून आज सहा महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला आहे. अजूनही हा पूर्ण पूर्ण नाही त्यामुळे लोकांच्या हाल अपष्टाकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे. 10 जूनला पूर्वीचा पूल पाडला त्याला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून आम्ही पुलाचे श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम घेतला आणि त्यानंतर थोडीशी हालचाल झाली. परंतु पुन्हा काम रखडले आहे, त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवत आहोत.

यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे सांगली शहराध्यक्ष संजय जाधव, सचिन देसाई, यांच्यासह अनेक व्यापारी व नागरिक उपस्थित होते.