| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २२ जुलै २०२४
'नरेंद्र मोदी'... महायुतीचा एक आश्वासक चेहरा !... नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काठावर का होईना, महायुतीने जनमत जिंकले, आणि नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावर बसण्याची हॅट्ट्रिक साधली.
परंतु महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. कदाचित यामुळेच महाआघाडी असो किंवा महायुती. 'मुख्यमंत्री पदाचा चेहरा' घेऊन आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यास कचरत आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारणी बैठकीत 'आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल !' असे जाहीर केले. आणि पाठोपाठ काल पुण्यातील भाजप कार्यकारणीच्या बैठकीमध्ये हाच कित्ता गिरवण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीने महाराष्ट्रात चांगले यश संपादन केले. त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी अनेक लायक चेहरेही आहेत. तरीही महाआघाडीच्या नेत्यांनी 'विना चेहऱ्याने' निवडणुकीस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. 'का ?' याचे उत्तर जगजाहीर... असाच प्रकार महायुतीच्या बाबतीतही... महायुतीकडेही अनेक दर्जेदार नेते... तरीही जनतेला प्रश्न पडला आहे महायुतीही विना चेहऱ्याने निवडणुकीस सामोरे का जात असावी ?... हेही एक उघड गुपितच...
एखादी व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य झाली की तिला सरपंच व्हावेसे वाटते, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक किंवा तत्सम महत्त्वाच्या संस्थेत अध्यक्षपद. आणि तेथून थेट विधानसभा किंवा लोकसभेत जाण्यासाठी लढाई लढली जाते. प्रकरण येथेच थांबत नाही, तर... आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागतात... लोकशाहीत यात गैर काहीच नाही. परंतु यासाठी जे फंडे वापरले जातात, त्यालाच नागरिकांचा आक्षेप आहे. पण ते बोलू शकत नाहीत... याचीही कारणे स्वच्छ...
सदस्य पदापासून सुरू झालेली ही शर्यत मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचते. मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अनेकांचा काटा काढला जातो. यातूनच संबंधिताचा विजयाचा मार्ग धुसर होतो... आणि हीच भीती महाआघाडी असो वा महायुतीला आहे... 'मुख्यमंत्रीपदाचा चेहरा' जाहीर केल्यास जनतेपेक्षा आधी स्वपक्षीयांकडूनच धोका... तो केवळ संबंधित व्यक्तीलाच नव्हे, तर राज्यात सत्ता स्थापण्यासाठी इमले बांधणाऱ्यांसाठी चिंतेचा विषय... आणि म्हणूनच 'मुख्यमंत्री पदाच्या चेह-याविना' विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा (शहाणपणाचा) निर्णय काँग्रेस व भाजपाने घेतलेला असावा...