| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जुलै २०२४
चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह नदीपात्र परिसरात पावसाची रिमझिम सुरूच असून, त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्याने वारणा नदीचे पाणी पात्र बाहेर पडले आहे. चांदोली धरणातील पाणी आणि परिसरात पडणारा संततदार पाऊस यामुळे शिराळा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
चांदोली प्रमाणेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने, धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी, वीज निर्मिती केंद्रातून पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान पंचगंगेने धोक्याच्या पातळीकडे आगेकूच सुरूच ठेवली असून ज्यामुळे नृसिंहवाडीतील कृष्णा नदी पात्रात हे पाणी वेगाने येत आहे. त्याचप्रमाणे वारणा नदीतील पाणी हे हरिपूर जवळील कृष्णा नदीत वेगाने मिसळत आहे. परिणामी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या वेगामुळे स्थिर असलेली कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली असून आयुर्विन पुलाजवळील पाणी पातळी 27 फुटापासून तीस फुटापर्यंत जाईल, असे सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पाटबंधारे व धरण प्रशासनातील अधिकारी कर्नाटकातील हिप्परगी आणि अलमट्टी धरणाच्या विसर्गावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता व अफवांवर विश्वास न ठेवता, काळजी घ्यावी असे सांगली सातारा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.