| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ जुलै २०२४
राहायला घर नाही, मरायला स्मशानभुमी नाही, जगायचे तर कसे जगायचे हा यक्ष प्रश्न राज्यातील विमुक्त जाती/भटक्या जमातीच्या लोकांसमोर उभा आहे. सतत पोटासाठी भटकंती त्यामुळे जन्मदाखलाच नाही, तर जातीचा दाखला कोठुन येणार आणि आरक्षण योजना व रोजगार तरी कसा मिळणार? जातीचे दाखले देणेबाबत शासन निर्णय होवूनही गेली 16 वर्षे या वंचित समाजाला न्याय मिळाला नाही. म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विमुक्त जाती, भटक्या जमाती समाज जोडो अभियान ऑल इंडिया या संघटनेमार्फत सुरू असलेल्या आमरण उपोषण स्थळी सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी समक्ष भेट देवून आंदोलनास कॉंग्रेस पक्षाचा पाठींबा जाहिर केला.
आणि जागेवर मा. प्रांतसो यांना फोन लावून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 01/10/2008 च्या शासन निर्णयानुसार विमुक्त जाती/भटक्या जमातीचे लोक सध्या ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्या ठिकाणची गृह चौकशी करून जात प्रमाणपत्रे द्यावीत व अशी प्रमाणपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य मानावे असा निर्णय घेतला आहे त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. सदरची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे हा समाज आरक्षण व रोजगार या शासकीय लाभापासून वंचित राहिला आहे. आपण तातडीने अप्पर तहसिलदार व तहसिलदार यांना शासन निर्णयानुसार या समाजाला जातीचे दाखले देणेसाठी आदेश द्यावेत अशी विनंती केली. प्रांताधिका-यांनी असे आदेश दिले जातील असे आश्वस्त केले.
आंदोलनस्थळी पृथ्वीराज यांनी या प्रश्नाकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे तातडीने लक्ष वेधण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात, विधानपरिषद गटनेते आ. सतेज पाटील व आमचे नेते आ. डॉ. विश्वजित कदम यांना या प्रश्नावर विधीमंडळात लक्षवेधी मांडण्यास सांगू असे सांगितले.