Sangli Samachar

The Janshakti News

दोन साहेबांमधून विस्तव जाईना, आमदार, कार्यकर्ते म्हणतात एकत्र येऊया !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ जुलै २०२४
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून अजितदादा महायुतीत डेरेदाखल झाले. सरकारात त्यांच्यासह आमदारांना महत्त्वाची खाती मिळाली. परंतु सहा महिने होत नाहीत तोपर्यंतच, महायुतीत अजित पवार गटाचे घुसमट होत असल्याची चर्चा सुरू झाली. अशात निवडणुकीमध्ये भाजप सह शिंदे-पवार गटाला अपेक्षित यश संपादन करता आले नाही, आणि याचे खापर फुटले ते अजित पवारांच्यावर संघ प्रणित 'विवेक' मासिकांमधून तर थेट डागण्या डागण्यात आल्या. परिणामी भाजप व अजित पवार गटात सुप्त संघर्ष सुरू झाला.

परंतु अजित पवार मात्र सरकार आणि महायुतीत जमवून घेण्याच्या मनस्थितीत दिसून आले. नुकतीच त्यांनी दिल्ली येथे भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली व आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही मागण्या केल्या. त्यासाठी प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगण्यात आले. परंतु आता अजित पवार गटाला आगामी विधानसभा निवडणुकीत अवघ्या 40 जागांवर बोलवण करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याने, पुन्हा एकदा अजित पवार गट 'काका'पुतण्याला' एकत्र आणण्याच्या वल्गना करू लागला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या आमदारांची भूमिका समोर आली आहे.


साहेब आणि दादा एकत्र आल्यास आम्हाला नक्कीच आनंद

विशेष करून पुण्यामधील अजितदादा गटाच्या तीन आमदारांनी जाहीरपणे शरद पवार आणि दादांनी एकत्र यावं असं बोलत आहेत. यामध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेनके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांचा समावेश आहे. या तिन्ही आमदारांनी एकत्र यावं, अशी भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आमदार सुनील शेळके यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास आनंदच असल्याचे म्हटले आहे. मात्र, हे स्वप्न एक महत्त्वकांक्षी नेता पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणत रोख नेमका कोणाकडे आहे अशीही चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी सुनील शेळके आणि अतुल बेलके यांनी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे अशी भावना व्यक्त केली होती. साहेब आणि दादा एकत्र आल्यास आम्हाला नक्कीच आनंद होईल असेही आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे.

अतुल बेनके शरद पवारांच्या भेटीला

काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यानंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार बेनके यांनी सहा महिने तटस्थ होते. मात्र, नंतर त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. परंतु, लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात अजित पवारांना धक्का बसला होता. बेनके यांच्या जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनी मताधिक्य घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर आता अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांकडे जात असल्याची चर्चा आहे.

अण्णा बनसोडेंकडून अतुल बेनकेंच्या सूरात सूर

दुसरीकडे, राजकारणात कधी आणि काहीही होऊ शकतं असं अतुल बेनके यांनी म्हटलं होतं. साहेब आणि अजित दादा एकत्र आले तर मला आनंद होईल. मी दादांकडे तशी मागणी ही करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. असं अजित पवार गटातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही अतुल बेनके यांच्या विधानचं समर्थन केलं आहे.

आता खुद्द शरद पवार साहेब आणि अजित दादा या साऱ्या घडामोडीनंतर काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्यसह दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष लागून राहिले आहे.