| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरु - दि. २३ जुलै २०२४
नावांप्रमाणेच असलेला माझा गांव, ‘सांगली बहु चांगली’. गावाच्या बाजूने कृष्णा नदी वाहत आहे. माझा गाव महाराष्ट्रातील एक जिल्हा. देशाच्या इतिहासामध्ये त्याचे स्थान कांहीसे मर्यादित असू शकेल, पण त्याचे वैशिष्ट्य इतिहासाच्या किचकट सनावळी व घटनांपुरतेच मर्यादित नाही.
आज या लेखातून माझ्या गावातील एका स्थानाची ज्याची ही ओळख... उजळणी म्हणा हवं तर...
श्री गणेश, माझ्या गावाचे आराध्य दैवत, नवसाला पावणारा, संकटे, विघ्ने, दुःख दूर करणारा, सुखकर्ता. या वक्रतुंड महाकायाचे आशीर्वाद घेण्यासाठी काकड आरतीला हिंदूची उपस्थिती तर असतेच पण कित्येक जैन, लिंगायत आदी सर्व धर्माचे भाविक वर्षानुवर्षे न चुकता उपस्थित असतात. अगदी मुस्लीम बांधवही... श्रींच्या आशीर्वादाने दिवसाची सुरूवात करतात. दिवसभरातील आपले व्यवहार ‘त्याला’ साक्षी मानून सचोटीने करतात आणि रात्री घरी परततांना, शेजारतीला उपस्थित राहून मनोभावे आळवतात, ‘हे भगवंता, तुझ्या कृपेने आजचा दिवस, सर्व कार्ये तुझ्या इच्छेप्रमाणे व माझ्या अल्प कुवतीप्रमाणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कांही उणे-दुणे राहिले असेल तर, हे दयावंता, कृपाळा या अज्ञाला क्षमा कर’, आणि समाधानाने आपल्या घरी मुलांबाळांमध्ये परततात.
श्री गणेशाच्या मंदीराच्या दक्षिण बाजूला एक मोठा रस्ता लागतो. या रस्त्यांने थोडे पुढे चालत गेले की शेणाचा वास येतो, नाक न मुरडता तसेच पुढे गेल्यावर उत्तर दिशेकडे वळणारा रस्ता आहे. या रस्त्यावरून 100 एक पावले चालले की गावची जीवनदायीनी नदीचे पात्र दिसते. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत जरूरीचे असणारे आश्वासन देणा-या अक्कलकोटवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदीर दृष्टीस पडते. नदीच्या पात्राकडे जाण्याचा रस्ता या देवळा समोरूनच जातो. देवळासमोरील रस्त्यांने पुढे जाऊन पाय-या उतरल्या की आपण पोहचतो त्या ठिकाणी ज्याची आज मी ओळख करून देत आहे.
रहदारीच्या मुख्य रस्त्यापासून, वाहनांच्या गोंगाटापासून कांहीसे दूर एकांतात असलेल्या या ठिकाणी तिथल्या घाटाच्या पाय-या उतरून खाली गेल्यावर आपल्याला भेटते श्री कृष्णामाई, काठावरील सर्वांच्या सुखदुःखांचा भार घेऊन संथ वाहणारी. तिच्या जवळ निवांतशी जागा बघून आपली बैठक जमवली, डोळे मिटले की, तो परिसर हृदयाच्या तारांचा ठाव घेतो आणि अंतरात्म्याशी एकरूप होऊन जातो.
नदीतील सुरेख मासोळ्यांच्या नृत्याचा ‘चुबक-चुबुक’ आवाज कानी पडू लागतो. मध्येच कोणी एक अनोळखी मित्र ‘शुहुओ, शुहुओ, शुहुओ’ आपल्या गोड बोलांनी साद घालू लागतो. मन प्रसन्न होऊन रामारंगी रमून जाते. हळूहळू बाह्य आवाज कमी कमी होत जातात. मनातील विचार, हेवेदावे, राग, द्वेष, कटुता संपून, मन सागराच्या तळाशी असलेल्या निरव शांततेकडे झुकु लागते. कांही वेळ असाच जातो आणि ‘त्याचे’ अस्तित्व मनाच्या पटलावर पसरून दुख-या मनाला भारून शांत करते. वेळेचे घड्याळ कधीच बंद पडलेले असते. मनोमन तृप्तता भरून पावल्यावर कांही वेळाने भान येते. नाईलाजाने तो परिसर सोडून कांहीशा अनिच्छेने परतावे लागते.
परततांना आपसुकच डोळे मिटले जातात, दोन्ही कर श्री कृष्णामाईला, श्री स्वामी समर्थ चरणी भक्तिभावाने जोडले जातात आणि अंतरंग प्रसवते, ‘तू माऊली सा-यांची, जसे तू मला सांभाळलेस, माझे सुकृत केलेस, तुझ्या काठावर असलेल्या, चरणी आलेल्या, तुझ्या सर्व मुलांचे कर’.
मित्रांनो, माझ्या गावातील मनाला तृप्त करणा-या या परिसराला अवश्य भेट द्या आणि जो आनंद मला मिळाला तो तुम्हीही मिळवा.
आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण...