| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २० जुलै २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने योजनांचा धडाका लावला आहे. यातून लोकसभा निवडणुकीत हरवलेल्या मतांचे गणित जमवायचे, हे त्यामागील उघड गुपित... यावरून सर्वच विरोधी पक्षांनी शिंदे सरकारवर तोंड सुख घेतले. या वाहत्या गंगेमध्ये सरकार विरोधी विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी हात धुवून घेतले. अगदी जरांगे पाटील ही यात मागे राहिले नाहीत. परंतु आता एका नव्या वादाने तोंड फुटले असून, त्याला तोंड देता देता शिंदे सरकारच्या नाकी नऊ आले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात शिंदे सरकारकडून ' मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजने'ची घोषणा करण्यात आली. ज्यानुसार राज्यातील पात्र जेष्ठ नागरिकांना देवदर्शन घडविण्याचे जाहीर झाले. इतर सर्व योजना प्रमाणेच या ही योजनेची विविध वृत्तपत्रात आणि सोशल मीडियावर जाहिरातींचा भडीमार केला गेला. आणि आता यातील एक जाहिरात शिंदे सरकारच्या अंगलट आली आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वरुडी येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेले तीन वर्षापासून बेपत्ता आहेत. याची पोलीस स्टेशनला आहे नोंद करण्यात आली आहे. परंतु अद्याप ते सापडले नाहीत. पण नुकतेच ते प्रकट झाले. प्रत्यक्षात नव्हे, तर "आता ज्येष्ठांना घडविणार आता धार्मिक स्थळांचे दर्शन" या जाहिरातीवर. ही जाहिरात पाहताच कुटुंबीयांना धक्का बसला.
याबाबत ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत तांबे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, "आम्ही आमच्या वडिलांना गेल्या तीन वर्षापासून शोधतो आहोत, परंतु ते सापडत नाहीत. आता मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात विभागाला ते कुठे आणि कसे सापडले ? याचा उलगडा होत नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवण्याचे ठरवले आहे, तर आता त्याने आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडवून द्यावे."
हा प्रकार उघडकीस येताच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. जाहिरातीत कोणाचाही फोटो प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची शहानिशा केली गेली, तर असे तोंड कशी पडावे लागत नाही, असा टोला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लगावला आहे. परंतु सदर जाहिरातीवर हा फोटो कसा आला याचा मात्र उलघडा अजूनही झाला नाही.