| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ जुलै २०२४
सांगलीतील शामराव नगर येथील मुस्लिम व ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेची पाहणी आज हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पावसाळ्यात त्या जागेवर चार ते पाच फूट पाणी साठलेले असते. सदर जागेवर आठ ते नऊ महिने सातत्याने पाणी साठलेले असते. अशी मृतदेह दफन करण्यासाठी योग्य नसलेली जागा भूसंपादन करण्यासाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व जिल्हा प्रशासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. मृतदेहाची विटंबना करणारी जमीन भूसंपादन करण्यासाठी घाईगडबडीत अधिसूचना काढण्याचा घाट का घातला जात आहे, असा सवाल यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.
या जागेच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असताना चौकशीमध्ये काय निष्पन्न झाले आहे हे आधी जाहीर करावे. सदरची जागा पूरपट्ट्यात आहे. या जागेत केवळ पावसाळ्यात नव्हे तर उन्हाळ्यातही चार ते पाच फूट पाणी साचलेले असते. मूळ जागा मालकांनी सदरची सहा एकर जागा, गुंठेवारी करून विक्री केलेली आहे. अशी जागा शासन भूसंपादित करतेच कसे ? बाजारभावाप्रमाणे या जागेची किंमत अवघे एक कोटी रुपये एकर असताना, चार कोटी रुपये एकर दराने 24 कोटीची किंमत केलेली आहे. या जमीन व्यवहारात अंदाजे 16 कोटी रुपयांचा संगमताने घोटाळा केला असल्याचा आरोप करून सांगली महापालिका तिजोरी बचाव समितीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत शिंदे यांनी चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. याचे पुढे काय झाले असा सवाल निर्माण होत आहे.
जीवन प्राधिकरणाने ड्रेनेजच्या कामासाठी सदरची जागा दललेलीमुळे उपयोगात आणता येत नाही, असे महापालिकेस कळविले होते. याच दरम्यान मूळ मालकाने बेकायदेशीर रित्या प्लॉट पाडून गुंठेवारीने या जागेची विक्री केलेली आहे. यातील 40 प्लॉट धारकांनी गुंठेवारी नियमिती करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. आरक्षित जागा बेकायदेशीर रित्या विक्री केल्याबद्दल प्रथम संबंधित मालकाची चौकशी व्हायला हवी.
या जागेला मूळ मालकाचे नाव आहे. भूसंपादन झाल्यानंतर या मालकास मोबदला मिळणार की, ही रक्कम प्लॉट धारकांमध्ये वाटण्यात येणार ? काही नगरसेवकांनी जमिनीचे वटमुखत्यार पत्र लिहून घेतले आहेत त्यांची ही चौकशी व्हायला हवी. प्लॉट धारकाला व जमीन मालकाला दिली जाणारी रक्कम यात मोठी तफावत आहे. सदर जागेकडे जाण्यासाठी रस्ता नाही. तो रस्ता करण्यासाठी व आरक्षण असलेल्या जमिनीवर भराव टाकण्यासाठी कोट्यावधी रुपयांची रक्कम खर्च करावी लागणार आहे.
तेव्हा या जागे बघत हट्ट सोडून योग्य जागा भूमी संपादन करीत मुस्लिम व ख्रिश्चन समाजाला द्यावे. सांगली शहरातील मुस्लिम व ख्रिश्चन समाजातील सुज्ञ व प्रतिष्ठित लोकांनी सदर जागेची पाहणी करून निर्णय घ्यावा. असे आवाहन हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी केले आहे.