| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरु - दि. २० जुलै २०२४
माझ्या चंचल मनाचा ओढा निषिद्धाकडे जास्त आहे हे मला समजले. पण त्यापासुन दूर राहण्यासाठी, काय करावे हे कांही मला सुचेना. विचार करता-करता मला आठवला सुमन.
सुमन, नियमितपणे व्यायाम; प्राणायाम, ध्यान-धारणा करणारा. नेहमी आनंदी, हसतमुख, निरोगी मन व शरीराचा, माझा मित्र, मार्गदर्शक व तत्वज्ञ.
मी सुमनच्या घरी पोहचलो. नेहमीप्रमाणे सुमनने हसतमुखाने माझे स्वागत केले, “ये राजा.” सुमनला त्याच्याकडे येण्याचे कारण मी सांगितले.
माझ्या मनात घोंघावत असलेला प्रश्न ध्यानात घेऊन सुमन म्हणाला,
“राजा, निषिद्धाच्या आकर्षणापासून कोण सुटले आहे ? महान संत श्री तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात,
या इन्द्रियांच्या ओढीपुढे माझे कांही चालत नाही
धांव घाली पुढें इन्द्रियांचे ओढी। केले तडातोडी चित्त माझे।।
तुका म्हणे माझा न चाले सायास। राहिलो हे आस धरूनी तुझी।।
तर श्री समर्थ रामदासस्वामी सांगतात, विषयाच्या या घाणीची शिसारी आली पण लाज कशी ती वाटत नाही,
मीपण अहंकारे अंगी भरला ताठा।
विषयकर्दमांत लाज नाही।
चिळस उपजली ऐसे झाले बा आतां।।
महात्मा गांधी, श्री. के. वि. बेलसरे यांच्यासारखे महान आत्मे त्यांच्या आत्मकथांमध्ये^१ निषिद्धापासून दूर राहणे किती कठिण आहे याचे वर्णन करतात.
सांगायचा मुद्दा, जिथे ऋषी-मुनी, संत, महात्मे, निषिद्धाच्या आकर्षणातून सुटले नाहीत तिथे तू, मी या ब्रम्हांडातील अत्यंत छोटे अंश, कसे सुटणार ? पण यातून थोडी कां होईना सवलत हवी असेल, सुटका हवी असेल, तर महान व्यक्तिंच्या जीवनशैलीचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे.
संत-महात्म्यांनी स्वतःला वाईट आचरणापासून दूर ठेवत आपले जीवन आदर्शवत कसे बनवले, त्यांना हे कसे साध्य झाले, त्यासाठी कोणत्या यम-नियमांचे त्यांनी पालन केले, कोणती साधना केली, कोणता मंत्रजाप केला हे जाणणे जरूरीचे आहे.
राजा, आपले मन चंचल असल्याने वाईट कृतींपासून दूर राहणे अत्यंत कठीण आहे हे निश्चित. पण, ज्याप्रमाणे रोगाचे मूळ समजल्यावर योग्य औषधोपचार करून रोग नष्ट करता येतो, किमान तो वाढणार नाही याची काळजी घेता येते, त्याप्रमाणे संत-महात्म्यांच्या जीवनशैलीचे, शिकवणुकीचे सार समजावून घेतले तर, निषिद्धाकडे, वाईट कृतींकडे धाव घेणा-या मनांला पूर्णपणे जरी थांबविता आले नाही तरी, त्याला रोखता येणे अशक्य नाही.” सुमनपुढे सांगू लागला.
“संत श्री नामदेव महाराज, निषिद्धाच्या आकर्षणाचे मूळ कशामध्ये आहे हे स्पष्ट करतांना सांगतात,
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा।
मन माझे केशवा कां बा नेघे।।१।।
सांग पंढरीराया काय करू यांसी।
का रूप ध्यानासी न ये तुझे।।२।।
कीर्तनी बैसतां निद्रें नागविलें।
मन माझे गुंतले विषयसुखा।।३।।
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती।
न ये माझ्या चित्ती नामा म्हणे।।४।।’
हे परमेश्वरा, तुझे नांव अमृताहूनही गोड आहे पण, तरीही हे माझे मन अमृताहूनही गोड असलेल्या तुझ्या नामाचे प्राशन करत नाही. तुझे रूप माझ्या ध्यानात येत नाही, समजत नाही. मी किर्तनांमध्ये (परमेश्वराच्या नामाच्या, त्याच्या सहवासात) बसतो अन् मला झोप येते. तुझे दास, सेवक तुझ्या किर्तीचा महिमा गर्जना करून सांगतात पण, ती माझ्या चित्तामध्ये, अंतर्यामामध्ये भरत नाही, कारण माझे मन विषयसुखात गुंतले आहे.
समजले निषिद्धाच्या आकर्षणाचे मूळ?” सुमनने मला विचारले.
“सुमन, आपले मन विषयसुखात गुंतलेले असल्याने ते चांगल्या गोष्टाकडे न वळता, क्षणभंगुर सुख देणा-या वाईट, अहितकारक, अपायकारक कृतीकडे चटकन वळते हे मला समजले. पण सुखाची, सुख मिळविण्याची, दुःख, वेदना टाळण्याची ओढ असणे हे नैसर्गिक नाही कां? त्यापासून दूर कसे राहता येईल?”
मी माझी शंका विचारली.
“राजा, तुझी शंका योग्य आहे सुखाची, सुख मिळविण्याची, दुःख, वेदना टाळण्याची ओढ असणे हे नैसर्गिक आहे. पण त्यासाठी निषिद्ध कृतीं करणे आवश्यक आहे असे नाही. त्यामुळे निषिद्ध गोष्टीं जर टाळायच्या असतील, तर निषिद्ध कृती करावयाला भाग पाडणारे जे मूळ कारण, आपल्या मनात उद्भवणारे विचार, त्यांना वेळीच ओळखून त्यांना बाजूला सारणे, गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक क्षणाक्षणांला मनामध्ये उद्भवणा-या विचारांना व त्यातील तीव्र विचारांतुन उत्पन्न होणा-या उर्मींना, ज्या आपल्याला कृती करायला भाग पाडतात, त्यांना ओळखले पाहिजे, जाणून घेतले पाहिजे. ‘विष - यी’ चे विचार, जे निषिद्ध कृतींचे जन्मस्थान आहे त्यापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”
सुमनने निषिद्ध कृतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कशाची आवश्यकता आहे हे स्पष्ट केले.
“सुमन तुझे सर्व सांगणे, स्पष्टीकरण पटते. पण मनात येणा-या विचारांना ओळखायचे कसे? विचारांमध्ये चांगले, वाईट, हितकारक, अहितकारक असा भेदाभेद कसा करायचा?” माझी शंका.
“राजा, आपल्या मनात येणारे विचार ओळखण्याचा, त्यांची मीमांसा करण्याचा उत्कृष्ठ मार्ग म्हणजे आत्मपरिक्षण व ध्यान करणे. कठोर आत्मपरिक्षणातून आपले विचार, चांगली – वाईट कृत्य आपल्याला समजू लागतात. वाईट विचार, कृत्य, क्रिया आपल्या मनाला क्लेश, दुःख, त्रास, ताण-तणाव देतात समजते आणि हे सर्व जर टाळायचे असेल तर वाईट विचारांना, त्यातून घडणा-या वाईट कृत्यांना आपण आपल्याच फायद्यासाठी, सुखासाठी, आनंदासाठी टाळले पाहिजे हे समजते.
एकदा कां हे समजले आणि मग दृढतेने आपल्या मनांत उठणा-या वाईट, अपायकारक उर्मींवर आपण अंकुश राखु लागलो की, हळूहळू आपल्या मनांमध्ये येणारी वाईट विचार, त्यांच्या परिणामी धडणारी वाईट कृत्ये व त्याचे परिणाम कमी होतात व आपले जीवन सुखी, समाधानी, आनंदी होते.
राजा, मी तुला आता हे जे कांही सांगितले ते आपल्या रोजच्या दैनंदिन आचरणात आणणे कठीण आहे पण अशक्य नाही. दिवसभरातील थोडासा वेळ तुझ्या व फक्त तुझ्या ख-या सुखासाठी राखून ठेव. त्यावेळेमध्ये फक्त तू आणि तूझे विचार असतील. तुझ्या विचारांना ओळख, त्यांचे निरीक्षण कर. राग, चिड, सूड, द्वेष, कटुता, मनस्वीपणाच्या विचारांना बाजूला सार, त्यांची जागा प्रेम, दया, माया, कारुण्य, मानवता या सारख्या चांगल्या विचारांना दे, आणि त्या परमदयाळू पित्याने, जगन्मातेने ज्या कारणासाठी आपल्याला हे मानवी जीवन दिले त्या धर्माचे पालन करून सुखी हो, आनंदी हो, समाधानी हो, कारण भगवान श्रीकृष्ण सांगतात,
‘नेहाभिक्रमनाशोSस्ति प्रत्यवायो न विद्यते |
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्|| ^२
या धर्माचे पालन केल्यामुळे कोणतेही नुकसान तर होत नाहीच उलट, याचे थोडेसे केलेले पालनही मृत्यूसारख्या दुःख वेदनांच्या मोठ्यातील मोठ्या भयापासून वाचविते. तेव्हा राजा, विषय सुखात गुंतलेल्या मनाच्या लहरीवर हिंदकळणारे कष्टाचे, दुःखाचे, जीवन जगायचे कि चिरंतन आनंदी, सुखी जीवन जगायचे हे तुझं तूच ठरव व त्याप्रमाणे वाग.” सुमनने सांगितले.
आणि मी, निषिद्ध कृतींपासून दूर राहण्यासाठी नियमीतपणे ध्यान-धारणा करायची, आत्मनिरीक्षण करायचे, व आपले उर्वरित जीवन सुखी, समाधानी, आनंदी करायचे हे मनोमन ठरवून सुमनचा निरोप घेतला.
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण
संदर्भः १.‘सत्याचे-प्रयोग’-म.गांधी,
‘आनंद साधना’-श्री. के.वि.बेलसरे,
२. श्रीमद् भगवद् गीता श्लोक ।।240।।