| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० जुलै २०२४
विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच महाविकास आघाडीची बैठक आयोजित केली जाईल व त्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा केली जाईल, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच चेहरा राहील असे सांगून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जागा वाटपाची चर्चा राज्य पातळीवरच होईल असे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के सी वेणू गोपाल, रमेश चेन्निथला यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेस पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व आमदारांची बैठक नुकतीच पार पडली, या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकार बैठकीत बोलत होते.
महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्यातील आर्थिक, सामाजिक परिस्थिती बिघडवली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जमिनी अदानीला दिला जात आहेत, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवून नेले असून, शेतकरी संकटात आहे असा आरोप करून पटोले पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून वीस हजार शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करीत नाही पण उद्योगपती अनिल अंबानी यांचे सतराशे कोटी रुपयांचे कर्ज माफ करते, अंबानी काय सरकारचे जावई आहेत का ? असा सवाल पटोले यांनी केला.
राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे देशातील सर्वात जास्त बेरोजगारी महाराष्ट्रात आहे. महायुती सरकारने महाराष्ट्राची अधोगती केली असून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
भाजपने 2014 पासून फेक नेरेटिव्ह पसरवले आहे. पण भाजपाच्या प्रत्येक नेरेटिव्हला जशास तसे उत्तर दिले जाईल. असे सांगून पटोले म्हणाले की भाजपला निवडणुकीतच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. आता लंडनहून शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्याचा देखावा महायुती करीत आहे. पण हे वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत हे इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच महायुतीने महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोपही नाना पटोले यांनी यावेळी केला.