yuva MAharashtra पोषण आहाराबाबत आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी उठवला विधानसभेत आवाज !

पोषण आहाराबाबत आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी उठवला विधानसभेत आवाज !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ जुलै २०२४

पलूस येथील कृषी नगरच्या अंगणवाडी क्रमांक 116 मधील शालेय पोषण आहारात मृत सापाचे पिल्लू सापडले असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. पलूस कडेगाव चे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरले. पलूस येथील पोषण आहारात सापाचे पिल्लू सापडल्यामुळे गरोदर माता तसेच लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे पोषण आहारात मृत सापाचे पिल्लू सापडणे ही अतिशय गंभीर बाब आहे अशा त्या मुलांच्या व मातांच्या आयुष्याशी खेळतोय का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


डॉ. कदम म्हणाले की यापूर्वी पोषण आहाराच्या रूपात हरभरा, तांदूळ, तिखट, डाळी असा कच्चा माल दिला जात होता. परंतु नवीन धोरणानुसार सर्व एकत्रित केलेला पॅकिंग केलेले साहित्य पुरवले जाते. यासाठी राज्यात एकाच कंपनीकडे ठेका देण्यात आला आहे, त्याच्याकडून पुरवण्यात आलेले हे साहित्य प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात किंवा अंगणवाडीत आल्यानंतर त्याची तपासणी होते का ? दोन महिन्यांचा माल एकाच दिवशी दिला जातो पण ते साहित्य दोन महिने सुस्थितीत राहते का ? असे प्रश्न उपस्थित करून डॉ. कदम यांनी याबाबत संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकारात दोषी असणारे ठेकेदार, अधिकारी व अन्य कोणी जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.


यानंतर डॉ. विश्वजीत कदम यांनी विधिमंडळात सविस्तर माहिती देऊन कारवाईची मागणी केली असता विधानसभा अध्यक्षांनी हा प्रकार अतिशय गंभीर असून शासनाने याची दखल घेण्याची सूचना केली. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराचे गंभीर दखल घेण्यात आली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरा दाखल सांगितले.

दरम्यान पलूस येथील पोषण आहारात सापाचे पिल्लू सापडल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. जिल्हा यंत्रणा सतर्क झाली असून, गरोदर माता व बालकांना देण्यात येणाऱ्या साहित्याचे कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून. याबाबत असा प्रकार आढळल्यास, जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.