yuva MAharashtra सांगलीतील झिका व्हायरसच्या शिरकावाने वाढले सर्वांचेच टेन्शन !

सांगलीतील झिका व्हायरसच्या शिरकावाने वाढले सर्वांचेच टेन्शन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली- दि. १२ जुलै २०२४
राज्यात सध्या सर्वत्र डेंगू, मलेरिया यासह झिका व्हायरसचे संकट डासांच्या पंखावरून घोंगावत आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या सांगलीत सध्या डेंगू मलेरियाच्या रुग्णांची वाढती संख्या नागरिकांसह आरोग्य यंत्रणाचे डोकेदुखी ठरलेली आहे. त्यातच सांगली शहरात झिका व्हायरसने शिरकाव केल्याने, सर्वांचेच टेन्शन वाढले आहे.

येथील शासकीय रुग्णालयाच्या परिसरामध्ये असलेल्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेल्या 85 वर्षीय रुग्णाचा रक्तजल नमुना 'झिका पॉझिटिव्ह' आला आहे. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असली तरी धोका टळलेला नाही. 


या वृद्ध रुग्णाची डेंग्यू व चिकुनगुनिया चाचणीसाठी सहा जुलै रोजी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली. ही चाचणी निगेटिव्ह आली; मात्र ताप कमी न आल्याने खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने एन्फ्ल्युएंझा व्हायरस पॅनेल टेस्ट केली. सात जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह असा तपासणी अहवाल आला. ताप असल्याने आठ जुलै रोजी फिवर पॅनेल मल्टिप्लेक्स पीसीआर ही चाचणी खासगी लॅबद्वारे करण्यात आली. अशक्तपणामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नऊ जुलै रोजी फिवर पॅनेल मल्टिप्लेक्स पीसीआर टेस्टचा तपासणी अहवाल आला. त्यामध्ये 'झिका' व्हायरसचे निदान झाले.

सदर वृद्धाला ताप खोकला अशी लक्षणे जाणवू लागल्याने स्थानिक डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. परंतु त्याचा ताप कमी न झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने या वृद्धाला शासकीय रुग्णालयाच्या परिसरामधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या वृद्धाच्या रक्तजल नमुना तपासणीत झिकाचा सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.