Sangli Samachar

The Janshakti News

सांगली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दोन ताईंनी उडी घेतल्याने दादा-बाबांची धाकधूक वाढली !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ जुलै २०२४
येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता असून सर्वच मतदारसंघांमध्ये मोठी चुरस पहावयास मिळत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश संपादन न करू शकलेल्या महायुतीने ती कसर विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याचा चंग बांधला आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशामुळे महाआघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचेही मनोबल उंचावले आहे. यामुळे महायुती आणि महाआघाडी दोन्हीकडे इच्छुकांची मोठी मांदियाळी पहावयास मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर सांगली विधानसभा मतदारसंघ चर्चेचे केंद्रबिंदू बनला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडी आणि महायुतीला धक्का देत विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी मुसंडी मारत मोठे यश संपादन केले. त्यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली असली तरी त्यामध्ये काँग्रेसची ताकद लागलेली होती हे लपून राहिलेले नाही विशेषतः माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आपले सारे वर्चस्व पणाला लावले होते. 

या सर्वांच्या खांद्याला खांदा लावीत काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी पायाला भिंगरी लावून प्रचार केला होता. मदन भाऊंना मानणारा कार्यकर्ता त्यांनी प्रचारात मोठ्या ताकतीने उतरविला होता, त्यामुळे खा. विशाल पाटील यांच्या यशात जयश्रीताईंचा सिंहाचा वाटा असल्याचे मानले जाते. आणि म्हणूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगली विधानसभा निवडणुकीत जयश्रीताईंच्या विजयाचा चंग बांधला आहे. जयश्री ताईंचीही इच्छा लपून राहिलेले नाही. या निवडणुकीत तिकिटासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे गत पाच वर्षापासून विधानसभा निवडणुकीसाठी पेरणी केलेल्या पृथ्वीराजबाबा पाटील यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. 

सध्या विद्यमान आमदार असलेले भाजपचे सुधीर दादा गाडगीळ यांची गत दोन विधानसभा निवडणुकीत चांगले मताधिक्य मिळवलेले होते. आता त्यांनी हॅट्रिकसाठी कंबर कसली आहे. गेल्या दहा वर्षात सुधीर दादा मोठ्या प्रमाणावर विकास कामे केले असून त्यांचा पारंपारिक मतदार त्यांच्यासाठी विजयाचा मोलाचा ठरू शकतो. परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्या याने आपणास संधी दिल्यास पूर्ण ताकतीने ही निवडणूक लढविणार असल्याचे सांगत, यावेळी रंगत वाढवली आहे.

सौ नीताताई केळकर यांचे वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी कनिष्ठ संबंध आहेत. राज्य पातळीवर भाजपासाठी महिला मतदारांचा टक्का वाढविण्यात नीताताईंचा सिंहाचा वाटा आहे. गेल्या अनेक वर्षापासून सांगली विधानसभा मतदारसंघात त्यांचे मोठे नेटवर्क आहे. मागील दोन्ही निवडणुकीत सुधीर दादांच्या यशामागे नीता ताईंचाही मोठा सहभाग असल्याचे सांगितले जाते. आणि म्हणूनच नेता त्यांच्या घोषणेने सुधीर दादांची धाकधूक वाढली आहे.

आता आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडीकडून बाबा की ताई त्याचप्रमाणे महायुतीतून दादा की ताई असा सवाल निर्माण झाला आहे. या चौघांचाही मतदार संघातील संपर्क आणि ताकद यांचा विचार करता ही निवडणूक चुरशीची होणार हे नक्की.