yuva MAharashtra शालेय जीवनात ध्येय निश्चित करा.. क्षमतेचा संपूर्ण वापर करणारे यशस्वी होतात - पृथ्वीराज पाटील

शालेय जीवनात ध्येय निश्चित करा.. क्षमतेचा संपूर्ण वापर करणारे यशस्वी होतात - पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जुलै २०२४
गोरगरीब पालकांची मुले खूप शिकून मोठी व्हावीत म्हणून पृथ्वीराज पाटील फौंडेशन कायमच बहुजन समाजातील लेकरांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवते. यशवंतनगर हायस्कूल गरीब मुलांना चांगले शिक्षण देते. या शाळेत गेल्या वर्षी स्नेहसंमेलनात संगणक संच देण्याचे आश्वासन दिले होते. आज शाळेला फौंडेशन तर्फे संगणक संच भेट देऊन त्याची पूर्तता केली आहे. दिवसेंदिवस मराठी शाळांना विद्यार्थी संख्येचा प्रश्न भेडसावत असताना या शाळेत प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्थ्यी पहिली पसंती देतात. संस्थाचालक व स्टाफ या शाळेतून आदर्श पिढी घडवत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या जमान्यात मराठी शाळेत मूल्य शिक्षण देणाऱ्या या शाळेचे अभिनंदन करतो असे उद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले. यशवंतनगर हायस्कूल येथे पृथ्वीराज पाटील फौंडेशनकडून शाळेला संगणक संच भेट देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संग्राम शिक्षण संस्थेचे चेअरमन किरण सुर्यवंशी होते.


प्रारंभी नागवंशी सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी फौंडेशन तर्फे यशवंतनगर हायस्कूल व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ८०० वह्यांचे वाटप विजया पृथ्वीराज पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजया पाटील यांनी गुणवंत, जयवंत व यशवंत व्हा. संपत्तीत आनंद नाही. दुसऱ्यांना मदत करणे हा खरा मानवधर्म आहे. खूप शिका आणि शाळेचे व आई वडीलांचे नाव करा असा आशीर्वाद दिला. यावेळी मुख्याध्यापक संजय कदम, रमेश शिसाळे, परवेझ मुलाणी, संजय पाटील, अनिल मोहिते, सुनील शिंदे, खोतवाडीचे सरपंच संजय सुर्यवंशी, दोन्ही शाळेचा स्टाफ आणि पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.