yuva MAharashtra अमेरिका जपान मधील मुलं गिरविणार 'गमभन' !

अमेरिका जपान मधील मुलं गिरविणार 'गमभन' !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ जुलै २०२४
उद्योग, व्यवसाय तसेच नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील आणि कुटुंबे परदेशात स्थायिक झाले आहेत. या कुटुंबातील मुलांना तेथील शाळेमध्ये दाखल करत असतात. या मुलांना आपल्या मराठीचे ज्ञान म्हणून, उत्तर अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळामार्फत मराठी भाषा शिकणाऱ्या पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांसाठी बालभारतीचे पाठ्यपुस्तके पुरविण्यात येणार आहेत. याबद्दल तेथील पालकांनी बृहन महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे व बालभारतीचे कौतुक केले आहे.

उत्तर अमेरिकेनंतर आता जपानमध्ये मराठी भाषा शिकणाऱ्या पहिले ते पाचवीच्या मुलांनाही बालभारती कडून पाठ्यपुस्तके पुरवली जाणार आहेत. यासाठी तेथे ग्रंथालयाचे उभारणी केली जाणार असून मराठी पुस्तकाच्या वाचनाचे गोडी लागावे यासाठी त्यांना मराठी शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा एक शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध केला आहे.


एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर आणि टोक्यो मराठी मंडळ जपान यांच्यामार्फत चालवल्या जात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा प्रसार करणे, त्यांना अभ्यासक्रम, पुस्तके उपलब्ध करून देणे, परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे यांसह कामकाजाचा आढावा, संनियंत्रणासाठी समन्वय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर आणि टोक्यो मराठी मंडळ जपान यांच्या प्रतिनिधींसह एकूण नऊ सदस्यांचा समावेश आहे. या समितीकडून दर महिन्याला कामकाजाचा आढावा घेतला जाईल. तसेच आवश्यकतेनुसार शासन मान्यतेने उपक्रमात बदल करण्याचा अधिकार समितीला असेल, असे स्पष्ट करण्यात आले.