Sangli Samachar

The Janshakti News

विक्रीसाठी तलवारी घेऊन आलेल्या संशयिताला मुद्देमालासह अटक, पोलीस सतर्क !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जुलै २०२४
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड मधील अतिक्रमण हटवण्यावरून मोठा राडा झाला. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व सांगली पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह संशयितांच्या मुस्क्या आवळण्याचे आदेश सांगली पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत. ठिकठिकाणच्या शांतता समितीच्या बैठकीतही जिल्ह्यातील सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी शांततेचे आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीत तलवारी विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आले आहे.


भगतसिंग विक्रमसिंग शिख असे तलवारींसह पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. सांगली शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अवैधपणे शस्त्रे बाळगणारे तसेच विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर होती. त्यातच एक तरूण आष्टा रस्त्यावर कृष्णा नदीजवळ तलवारी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकातील पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून रचून शिख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीला बांधलेल्या पोत्याची तपासणी केल्यानंतर, त्यामध्ये तलवारी सापडल्या आहेत. त्यानंतर त्याला अटक करुन पोलिसांनी त्याच्याकडून दुचाकी आणि तलवारी जप्त केल्या आहेत. दरम्यान, सदर व्यक्ती विरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.