yuva MAharashtra केदारनाथ मधून २२८ किलो सोने गायब झाल्याचा शंकराचार्यांचा गंभीर आरोप !

केदारनाथ मधून २२८ किलो सोने गायब झाल्याचा शंकराचार्यांचा गंभीर आरोप !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ जुलै २०२४
केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. 228 किलो सोने गायब झाले आहे. त्याची आजतागायत चौकशी झालेली नाही. याला जबाबदार कोण? ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुंबईत केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून ते मातोश्री बंगल्यावर आले होते. त्यावेळी वरील गंभीर आरोप करून अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की आम्ही सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. पुण्य आणि पापाची भावना येथे स्पष्ट केली आहे. गोहत्या हे सर्वात मोठे पाप असल्याचे म्हटले जाते. परंतु त्याही पेक्षा मोठे पाप म्हणजे विश्वासघात. आणि उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात झाल्याने प्रत्येकाच्या हृदयात वेदना होत आहेत. त्यांचे सरकार पाडणे ही चांगली गोष्ट नाही. तो हिंदू असूच शकत नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.


आम्ही दिल्लीत प्रतिकात्मक केदारनाथ बांधू, अशी वल्गना केली जात आहे. परंतु हिमालयात असलेल्या केदारनाथाचे स्थान तुम्हाला का बदलायचं आहे ? राजकीय हितसंबंध असलेले लोक आमच्या धार्मिक स्थळांमध्ये घुसत असण्याची टीकाही अविमुक्तेश्वरानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली आहे.

दरम्यान शंकराचार्य यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते संजय निरूपम यांनी, शंकराचार्यांना हे शोभत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. जगतगुरु अविमुक्तेश्वरानंदजी यांचे विचार धार्मिक पेक्षा राजकारणाकडे झुकणारे असल्याचा आरोप निरूपम यांनी केला आहे. ठाकरे यांना भेटणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो त्यावर आक्षेप नाही पण अंतर्गत वादावर राजकीय भाष्य करणे त्याने टाळायला हवे होते. मुख्यमंत्री कोण हे जनता ठरवेल. धार्मिक मान्यता असलेल्या शंकराचार्यांनी यामध्ये हस्तक्षेप करणे चुकीचे आहे असे निरूपम यानी म्हटले आहे.