| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० जुलै २०२४
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे, त्यातून मिळणाऱ्या पंधराशे रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी राज्यभरातील महिलांची एकच झुंबड उडाली आहे. मात्र यासाठीच्या कागदपत्राची जुळणी करण्यासाठी, त्याला धावाधाव करावी लागली. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या योजनेत काही बदल करीत ती आणखी सुटसुटीत केली. त्यामुळे लाखो महिलांनी राज्यभरातून यासाठी अर्ज दाखल केले आहेत.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सेतुसह ई-सेवा केंद्रात महिलांची मोठे गर्दी होत आहे. यातील अनेक महिला अशिक्षित असल्यामुळे एजंटांचे चांगलेच फावले आहे. त्यांच्याकडून महिलांचे लूट होत असल्याचा आरोप झाल्यानंतर राज्य शासनाने याबाबत महिलांची लूट करणाऱ्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याची घोषणा केली. आता या फसवणुकीमध्ये घट झाली असली तरी, 'खोट्या भावांकडून' अर्थात सायबर गुन्हेगारांकडून महिलांचे फसवणूक होत असल्याची घटना समोर आली आहे. यामधील पंधराशे रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना फोन करून त्यांचे बँक डिटेल्स मागवून, बँकेतील रक्कम हडप केले जात आहे. पुण्यातील अनेक भागात अशा घटना घडल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. त्यांनी पोलिसांना याबाबत तातडीने पावले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच महिलांनीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, आपल्याला असा फोन आल्यास बँकेची कोणतीही माहिती देऊ नये, आणि याबाबत स्थानिक पोलिसात तात्काळ तक्रार दाखल करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभरातून मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. शासनाकडून स्थानिक प्रशासनाला ' एकही लाभार्थी भगिनी' यापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. यासाठी ऑफलाइन अर्जाबरोबरच ऑनलाइन अर्जही स्वीकारण्यात येत आहेत. नारी दूत हे ॲप हे लॉन्च करण्यात आले असून, परंतु महिलांनी या ॲपवरून अर्ज दाखल करताना, 'सर्वर डाऊनसह' इतर काही त्रुटींमुळे अर्ज भरण्यास अडथळे येत आहेत. लवकरच या त्रुटी दूर करून हे ॲप सक्षमपणे कार्यरत करण्यात येईल असे शासनाकडून सांगण्यात आले आहे.