| सांगली समाचार वृत्त |
जयसिंगपूर - दि. १३ जुलै २०२४
वात्सल्यरत्नाकर, शांतमूर्ती प.पू. 108 आचार्य श्री सन्मतीसागरजी महाराज यांचे परमप्रभावक शिष्य युवासम्राट, वाणीभूषण प.पू.108 आचार्य चंद्रप्रभुसागरजी महाराज व प.पू.108 श्री सरलसागरजी महाराज यांचा येथील भ. पार्श्वनाथ जिनमंदिर, चौथी गल्ली, जयसिंगपूर येथे विद्यासन्मतीदास पावन वर्षायोग (चातुर्मास) संपन्न होत आहे.
प.पू.108 आचार्यश्री चंद्रप्रभुसागरजी महाराज यांचे आज सकाळी जयसिंगपूर नगरीत आगमन झाले असून समस्त श्रावक-श्राविकांनी आचार्यश्रींची पादपूजा, राजस्थान ढोल, रथ, घोडा, प्रथमाचार्य प.पू.108 आचार्यश्री शांतिसागरजी महाराज यांची प्रतिमा बसविलेल्या बैल जोडीसह 108 मंगल कलश घेवून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आचार्यश्रींच्या जयघोषात जयसिंगपूर नगरीतील प्रमुख मार्गावरून 9 वी गल्ली व येथून जिनमंदिरामध्ये मुनिंचे भव्य मिरवणुकीने स्वागत करण्यात आले.
पूज्य आचार्यश्रींचे जयसिंगपूर नगरीमध्ये प्रथमच चातुर्मास संपन्न होत असून त्यांच्या प्रभावी वाणीने जयसिंगपूर परिसरातील समस्त श्रावक-श्राविकांना तसेच युवा वर्गाला ही एक आध्यात्मिक पर्वणीच ठरणार आहे.
या चातुर्मासाचे संयोजक जिनमंदिर कमिटी, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, जैन महिला परिषद, स्वाध्याय मंडळ, कल्पद्रुम समिती व समस्त जैन समाज करीत आहेत. सदर चातुर्मास हा फक्त एका जिनमंदिरातील नसून जयसिंगपूरातील सर्व मंदिरे ही एकच असून हा एकत्रित जयसिंगपूरचा चातुर्मास व्हावा. या चातुर्मासाच्या निमित्ताने आध्यात्मिकतेबरोबर एकतेचाही संदेश जावा अशी भावना आचार्यश्रींनी आपल्या आशीर्वचनात सांगितले. आचार्यश्रींच्या स्वागतासाठी जयसिंगपूर नगरीतील सकल जैन समाज मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित होता.