| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरू - दि. १४ जुलै २०२४
रविवार सुट्टीचा दिवस. सकाळचे नऊ वाजले होते तरी आकाशात सूर्यनारायणाचे दर्शन होत नव्हते. सगळीकडे अंधारून आले होते. काल रात्रीपासूनच पावसाची पिरपिर सुरू झाली होती. पाण्याची किचकिच, कोंदटलेली हवा, वातावरणात उत्साह कसला तो नव्हता. मला ध्यानकेंद्रात सत्संगाला जायचे होते पण, हे उदास वातावरण आणि नेहमीच असा अवेळी येणारा पाऊस, ... ओह ...वैताग आहे ...काय करावे ... मन अगदी बेचैन झाले. पण कसा कुणास ठाऊक पाऊस थांबला आणि मी ध्यानकेंद्रात पोहचलो.
त्या दिवशी स्वामीजींनी सत्संगात ‘वर्तमानकाळात जगा, म्हणजे तुम्ही आनंदी राहाल.’ असा उपदेश कांही उदाहरणे देऊन केला. सत्संग चालू असतांना माझा वेळ छान आनंदात गेला. सत्संग संपला आणि घरी जाण्यासाठी मी ध्यानकेंद्राच्या बाहेर आलो. आणि शट्... पावसाची पिरपिर परत सुरू झाली.
मी ध्यानकेंद्रात माघारी फिरलो. ध्यानकेंद्राच्या व्हरांड्यामध्ये माझ्यासारखे पावसात सापडलेले बरेच जण पाऊस थांबण्याची वाट पाहत उभे होते. कपाळावर आठ्ठ्यांचे जाळे आणि मनात विचारांचा गुंता घेऊन मीही तिथे उभा राहिलो. थोडा वेळ गेला पण पाऊस कांही थांबायचे नांव घेईना. उलट त्याचा जोर वाढला. सुरुवातीच्या पिरपिरीचे रूपांतर आता मुसळधार पावसात झाले आणि त्याचबरोबर माझ्या मनातील ठुसठुसही वाढली.
"ओह, कधी थांबणार हा पाऊस.... आता घरी जायला उशीर होणार ..... जेवण उशीरा ..... सुट्टीच्या दिवशीपण दुपारी झोपायला मिळणार नाही .... छ्या ... सा-या अडचणी या अवेळी येणाऱ्या पाऊसामुळे ..... वैताग आहे हा पाऊस म्हणजे.... आता रिक्षावाला अडवून नक्की जास्त पैसे मागणार ..... बरं भिजत जावं तर परवाच नवीन बूट विकत घेतलेत ते खराब होणार, कपडे भिजणार, सर्दी-ताप-खोकला, काय सांगावे न्युमोनियासुद्धा होईल. वाचवलेली रजा घ्यावी लागणार. परत औषधांचा खर्च आहे तो आहेच. सगळे नुकसानच नुकसान. काय करावे... कधी थांबणार हा पाऊस"...
माझ्या मनाने जशी जोरजोराने कण्हायला सुरुवात केली तसे पावसाच्या धाराही आपला आवाज जोरजोराने आवाज करू लागल्याः ठणऽठण...ठणऽठण...ठणऽठण.
जसजसा वेळ जाऊ वागला तसतसा मला माझाच राग येऊ लागला, चिड येऊ लागली. पण रागावून, चिडून कांही उपयोग नाही हे लक्षात आल्यावर त्यांचे रुपांतर नैराश्यात झाले. मी माझ्या मलाच दोष देऊ लागलो.
‘कुठुन बुद्धी झाली आणि आज सत्संगाला आलो. .... बरं सत्संगात ऐकले तर कायः वर्तमान काळात जगा म्हणजे नेहमी आनंदी राहाल..... कांहीतरीच काय?'
ठणऽठण...ठणऽठण...ठणऽठणाट करत असा वेळी-अवेळी पडणा-या पावसामध्ये कुणाला तरी आनंद होईल कां? अगदी अव्यवहारिक उपदेश. आता या पुढे रविवारी सत्संग वगैरे कांही नाही. मस्त पैकी १०-११ वाजेपर्यंत झोपायचे. बायकोने बनवलेल्या स्पेशल डिशवर उभा-आडवा हात मारायचा आणि परत जे ताणून द्यायची ते संध्याकाळी ५ वाजताच उठायचे. माझ्या मनाने पुढच्या रविवारचे नियोजन तयार केले तरी, ह्या रविवारी त्या क्षणी कोसळणारा पाऊस कांही थांबायला तयार नव्हता.
ठणऽठण....ठणऽठण...ठणऽठण. आवाजाची गती व लय वाढतच होती, काय करावे मला सुचेना.
अन् अचानक ‘धप्प’ असा आवाज झाला. आवाजाच्या दिशेने मी पाहिले. ५–६ वर्षांच्या एका चिमुरडीने ध्यानकेंद्राच्या बाहेर रस्त्यावर साठलेल्या पावसाच्या पाण्यात उडी मारली होती. तिची आई ‘अग, पावसात भिजू नकोस, आजारी पडशील, ये आत ये’ म्हणत होती. पण ती चिमुरडी; ‘पिंऽगा पिंऽगा, होऽपिंगा, हो, पिंऽगा होहो’ म्हणत, मध्येच आपली जीभ बाहेर काढून आईला चिडवत, आनंदाने नाचत होती.
त्या चिमुरडीला पावसाचा तसा आनंद घेतांना पाहुन माझ्या मनातील नेहमीचा ‘तो’ कोपरा तशा भर पावसात कुठूनतरी उगवला व मला म्हणाला,
“राजा, बघ त्या चिमुरडीला, आहे का उद्याची चिंता, कशी आनंदात आहे. नाहीतर तू. आता माझे कसे होणार याचा विचार करत, ठण... ठण... ठण वाजणारे घणाचे घाव मोजत निराश होऊन बसला आहेस. लक्षपूर्वक बघ, त्या छोट्या मुलीचे डोळे, कसे आनंदाने, हर्षाने चमकत आहेत. शिक त्या लहान मुलीकडून, जीवनाचा आनंद कसा लुटायचा ते”.
मला हिणवुन मनाचा ‘तो’ कोपरा अदृश्य झाला.
मी मनाशी कांही विचार केला आणि ‘धप्प’. रस्त्यावरील पावसाच्या पाण्यात मीही उडी मारली आणि..... पावसाच्या पाण्याच्या थेंबानी जणू जादू केली. माझे मन उल्हासित झाले. पाण्याचे थेंब माझ्या सर्वांगावरून ओघळू लागले अन् माझ्या सर्व अंगावरून मऊशार, मखमली हात हळुवारपणे फिरत आहेत असे मला वाटले. आईच्या दुधावरील साईसारख्या मऊ हातांची, मायेची मला आठवण झाली. माझ्या मनाचा मोर थुई-थुई नाचु लागला. पावसाच्या ठण.. ठण.. ठण.. ठण... आवाजाचे रूपांतर जलतरंगाच्या छुम.. छुम... छुम ध्वनीमध्ये झाले.
आणि मी विसरलो, अवेळी आलेला तो पाऊस.
मी विसरलो, पावसाची पिरपिर, सगळीकडे दाटलेला अंधार.
मी विसरलो, पाण्याची किचकिच, कोंदटलेली हवा. मी विसरलो माझी बेचैनी, माझे नैराश्य, माझ्या चिंता,
मी विसरलो माझे कण्हणे, माझे ठुसठुसणे.
मनाला त्रास देणारा प्रत्येक विचार मी विसरलो अन् आपोआपच मी जलतरंगाच्या छुम... छुम... छुम ... आवाजाच्या, मायेच्या त्या मऊ स्पर्शाचा, त्या क्षणाच्या आनंदात न्हाऊन गेलो. पावसाच्या तालावर माझ्या मनामध्ये एका कवितेच्या -1 ओळी आनंदाने तरंगू लागल्या.
आकाशातून बरसती अमृतधारा घेण्या चुंबन तुझे,
रूपेरी हे थेंब धरती ताल माथ्यावरी तयांचे,
जलतरंग हे गाती आनंद गीत तुजसाठी,
जगन्नाथाने निर्मिला पादपथावर शांत पक्षी,
काळोखी जीवनात आनंदाचा एक पक्षी,
गीत गातो तो घरट्यावर अन् प्रत्येक झाडावर,
दूर सारुनी नैराश्य आनंद वर्षवी तुजवर,
प्रिय हा पाऊस मजला, मीही करतो प्रेम पावसावर !
आनंद, आनंद आणि फक्त आनंद. आनंदाने मी नाचत होतो, रडत होतो, हसत होतो, गात होतो.
घरापर्यंतचे अंतर पार पडून घर कधी आलो हेच मला समजले नाही. मी घरी पोहचलो आणि माझ्या मनातील ‘तो’ कोपरा परत एक वेळ उद्भवला. मी त्याच्याकडे निरखून पाहिले. ‘तो’ ही माझ्यासारखा पावसाच्या पाण्याने नखशिखांत भिजून चिंब झालेला होता.
“काय राजा, आली कां नाही पावसात भिजायला मजा ? पण काय रे, तूझ्या त्या निराश, नकारार्थी विचारांने सारखे कॅ्वक-कॅ्वक केकाटणा-या घाणेरड्या बदकाचे रूपांतर सुंदर डौलदार राजहंसात कसे काय झाले?”
खरं तर, हा प्रश्न मलाही पडला होता. मी गप्प बसल्याचे पाहून माझ्या मनातील ‘तो’ कोपरा माझ्याशी सुसंवाद साधत बोलू लागला.
“ राजा, या बदलाचे कारण आहे तुझ्या विचारातील बदल. ज्या क्षणाला तू पावसात झेप घेतलीस तुला ना उद्याची अनावश्यक चिंता होती, ना भूतकाळाच्या कटु आठवणींचे ओझे होते. तुझ्या मनातील उलट्या सुलट्या विचारांच्या कोल्यांट्या थांबल्या होत्या. आणि आयुष्याच्या या संध्याकाळी तरी कां होईना तू जगायला मिळणारा प्रत्येक क्षण खऱ्या अर्थाने जगत होतास.
राजा, भूतकाळामध्ये घडून गेलेल्या कटु घटनांचा मागोवा घेत राहणे आणि भविष्यकाळातील अनिश्चित घटनांवर विचार करत बसणे म्हणजे हातातील वर्तमानकाळामध्ये दुःख व चिंता यांना आमंत्रण देणे. तुला जर दुःख, चिंता नको असेल, तर या पुढे भुत-भविष्यातील काळजींचा त्याग कर व मिळत असलेल्या वर्तमान क्षणांचा आनंद लूट आणि घाणेरड्या बदकाचे सुंदर राजहंसात रूपांतर कर.”
माझ्या मनातील ‘तो’ कोपरा आपल्या जागी परतला. आणि यापुढे ‘पावसाचा आनंद’ पुरेपुर लुटायचा याची मी खुणगाठ बांधली.
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण
संदर्भ १. कविता लेखन आधार लँगस्टन ह्यूजेसची मूळ इंग्रजी कविता Let the rain