| सांगली समाचार वृत्त |
मुंबई दि. १२ जुलै २०२४
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेसाठी निवडणुकीचे धमासान सुरू आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकी वाढली आहे. या निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार अगदी सहजपणे निवडून येऊ शकतात. प्रश्न आहे तो त्यांनी उभा केलेल्या ज्यादा उमेदवाराचा. आणि या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काँग्रेस मधील कुठली मते फुटतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे 37 मतं आहेत आणि काँग्रेसने 1 उमेदवार दिला आहे. काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी 24 पहिल्या पसंतीची मतं आवश्यक आहेत, पण कोणताही घोळ टाळण्यासाठी काँग्रेस किमान 27 ते 28 मतं आपल्या उमेदवाराला देतील. यानंतरही काँग्रेसकडे 9 ते 10 मतं शिल्लक राहतात.
काँग्रेसकडे शिल्लक असलेली ही 9 ते 10 मतं महाविकासआघाडीतील उमेदवाराला जातात का महायुतीच्या उमेदवाराला जातात? महायुतीला काँग्रेसची ही मतं फोडता येणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत सगळेच पक्ष काठावर असल्यामुळे सर्व पक्षीयांनी काँग्रेसची ही मतं मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. 11 वा उमेदवार निवडून आणण्यात काँग्रेस किंग मेकर ठरणार हे निश्चित आहे.
दरम्यान भाजपच्या दिल्ली दरबारामध्ये आपले वजन वाढवण्यासाठी अजित पवार काँग्रेसची तीन मते फोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांना त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पाच मतांची गरज आहे. यामध्ये करमाळ्याचे संजय मामा शिंदे आणि स्वाभिमानीचे देवेंद्र भुयार हे दोन अपक्ष आमदार अजित दादांसोबत आहेत. उरलेल्या तीन मतांसाठी त्यांना काँग्रेसवर अवलंबून राहावे लागणार आहे. कारण 'काकांचे' आमदार त्यांच्या पारड्यात आपली मते टाकणार नाहीत हे नक्की. यामुळेच 'दादांची भिस्त आहे ती नानांवर'...
या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडे असलेल्या आमदारांपैकी मुंबईस्थित आमदाराचे वडील आणि माजी मंत्री हे आधीपासूनच राष्ट्रवादीसोबत आहेत, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असलेले हे युवा आमदार राष्ट्रवादीला मतदान करू शकतात का? याशिवाय उत्तर महाराष्ट्रातून नरहरी झिरवळ यांचे आमदार मित्र आणि काँग्रेसच्या महिला आमदार, असे 3 आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.
आणि म्हणूनच 'नऊचं गणित ठरणार भारी, दादांचा उमेदवार जाणार विधान परिषदेच्या दारी !' असं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. परंतु निवडणुकीच्या युद्धात थारा नसतो 'जर तर' च्या गोष्टींना थारा नसतो. तिथं डोळ्यात तेल घालून सतर्क राहावं लागतं. म्हणूनच अजितदादांसाठी ही निवडणूक आपल्या अस्तित्वासाठी गरजेची बनलेली आहे. यात ते बाजी मारणार का याचे उत्तर विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतरच समजेल.