Sangli Samachar

The Janshakti News

बॅ. पी.जी. पाटील स्मरण



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जुलै २०२४
सांगली जिल्ह्यातील कवलापूर या गावाचे नाव राज्य पातळीवर चर्चेत आणणारे बॅ. पी.जी. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे कर्तृत्व, वक्तृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम होते. त्यांचे गुरू व्ही.के.गोकाक त्यांना ' पीजी ' म्हणत. पुढे हेच नाव रूढ झाले. ' बालतरंग ' हे हस्तलिखित मासिक वाचून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांना शिक्षणासाठी सातारला नेले.

शंभर टक्के रयत प्रॉडक्ट असलेले पी.जी. सर इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झाले. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी तुरुंगवास भोगला. १९५२ ला इंग्लंडहून परत आल्यानंतर त्यांनी व पत्नी सुमतीबाई यांनी रयत मध्ये अध्यापक व प्राचार्य म्हणून काम पाहिले. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य अशा पदांवर त्यांनी काम केले. विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी प्रवासभत्ता नाकारला. विद्यार्थ्यांनी दिलेला निधी शिवाजी कॉलेजच्या स्पर्धा परीक्षा केंद्राला दिला. बहुतेक सर्व संपत्ती रयत व विद्यापीठाला दान केली. 


ग्रामीण जनतेशी सहज संवाद साधणारे पी.जी. सर उत्तम जनसंवादी वक्ते होते. घटना व प्रसंगाचे नाट्यमय सादरीकरण करीत. सामाजिक परिवर्तनातील सुधारणावादी परंपरेचे ते प्रतीक होते. अण्णांच्या विचारांचे राजदूत म्हणून वावरले.

पी.जी. सरांनी ' शिलेदार ' या टोपण नावाने लेखन केले. कर्मवीरोपनिषद या कर्मवीरांच्या आठवणींचा संग्रह, ' The Bountiful Banyan ' हे चार खंडातील अण्णांचे इंग्रजी चरित्र लिहिले. आगामी २०२१ हे पी.जी. सरांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. ते आयुष्यभर कर्मवीर अण्णांच्या विचारांचे दूत म्हणून वावरले.

संजय थोरात, ईश्वरपूर.