Sangli Samachar

The Janshakti News

स्वच्छ सांगली सुंदर सांगली, घाण करून वेशीला नेऊन टांगली !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जुलै २०२४
"स्वच्छ सांगली सुंदर सांगली" ही सांगली नगरीचे टॅगलाईन. ती अधिक सुंदर करण्यासाठी महापालिकेतर्फे प्रत्येकाच्या घरापर्यंत घंटागाडीची सोय केलेली. नागरिक ही प्रामाणिकपणे (?) त्यामध्येच घरातील कचरा देत असतात. याशिवाय शहरात ठिकठिकाणी कचराकुंडीचीही सोय केलेली आहे... असे असूनही शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठलेले आढळतात. ज्या ठिकाणी कचराकुंडी आहे, तेथे तर 'कचराकुंडीत कचरा की कचऱ्यात कचराकुंडी ?' असा प्रकार आढळून येतो. शहरातील जवळजवळ प्रत्येक कचराकुंडी जवळ असेच दृश्य आढळून येते.

याला दुजोरा देते, ते वरील छायाचित्र. रस्त्यावर पडलेला हा कचरा महावीर मनगर मधील गुजराती कॉलेज जवळचा. पूर्वी येथे कचराकुंडी होती. पण आता ती तिथे नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी त्या ठिकाणी रस्त्यावरच कचरा टाकण्यास सुरुवात केली. शेजारीच 'पुरुष स्वच्छतागृह' स्वच्छतागृह नावालाच. कारण येतील घाण पाणी या कचऱ्याच्या ठिकाणासह आसपास साचलेले. त्यामुळे येथे प्रचंड दुर्गंधी... 


या ठिकाणी चहाची एक टपरी आणि व्यावसायिक संकुल. येथे येणाऱ्या नागरिकांना या घाणीचा प्रचंड त्रास होतो. याबाबत महापालिकेकडे तक्रारीही गेल्याचे समजते. परंतु या तक्रारींनाच कचराकुंडी दाखवण्यात येत असावी... शेजारीच लहान मुलांचे हायस्कूल. या साऱ्यांचे आणि येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. आता लोकप्रिय आयुक्त शुभम गुप्ता यांनीच या कचराकुंडीसह महापालिका क्षेत्रातील सर्व कचराकुंड्यांचे पाहणी करावी व नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना योग्य ते शासन करावे, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.