yuva MAharashtra पारख पुस्तकाची असो कि ..... (✒️ राजा सांगलीकर

पारख पुस्तकाची असो कि ..... (✒️ राजा सांगलीकर


| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरू - दि. २९ जुलै २०२४
‘Do you judge a book by its cover?’ तुम्ही एखाद्या पुस्तकाची पारख त्याच्या मुखपृष्ठावरून करता कां? हा प्रश्न ग्रेटचेन रूबीन-१ यांनी त्यांच्या ब्लॉगच्या एक लेखामध्ये माझ्यासारख्या वाचकांना केला होता. 
ब्लॉगमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नाचे मनातल्या मनात मी उत्तर दिले. पुस्तकाच्या आकर्षक मुखपृष्ठामुळे माझे लक्ष पुस्तकाकडे वेधले जाईल. पण, पुस्तकाची पारख त्यातील मजकुर ते पुस्तक वाचल्यानंतर मला करता येईल. शिवाय पुस्तकाचा विषय, त्यामध्ये मांडलेला विचार, त्याची व्याप्ती, विषय मांडण्याची, स्पष्टीकरणाची पद्धत, छपाईसाठी वापरलेला कागद व छपाईचा दर्जा, व्याकरण, शुद्धलेखन असे वेगवेगळे मापदंडवर पुस्तकाची पारख होईल. थोडक्या शब्दांत सांगायचे तर, पुस्तकाची पारख ही पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून न होता त्यातील मजकुर, मांडणी व अन्य घटकांवर होते.    
रूबीन यांच्या प्रश्नाला मला सुचलेल्या योग्य उत्तरावर माझी पाठ मी थोपटत असतांना माझ्या मनातींल ऺतो' नेहमीचा कोपरा उपस्थित झाला आणि त्यांने मला विचारले, 

"राजा, पुस्तकाची पारख म्हणजे त्याचे मूल्यमापन त्याच्या मुखपृष्ठा ऐवजी म्हणजे त्याच्या बाह्यरूपा ऐवजी आतील मजकुर, मांडणी, अन्य घटक यांच्या आधारे होते हा तुझा विचार योग्य आहे. पण, एखाद्या व्यक्तिची पारख करतांना, तू कोणकोणते मापदंड लावतोस, कशा कशाच्या आधार घेतोस आणि त्याबद्दल आपले चांगले-वाईट मत बनवतोस ?"


मनातील 'त्या' कोप-याच्या प्रश्नावर मी विचार करू लागलो. 
'एखाद्या व्यक्तिची पारख त्याच्या किंवा तिच्या रूपावर, तो किंवा ती दिसायला कशी आहे, सुंदर आहे की कुरूप आहे, कातडीचा रंग कसा आहे, काळा की गोरा आहे, कुठल्या वस्तीत राहतो-राहते, कुळ, वंश, जात, धर्म कोणता आहे, तो-ती उच्च विद्याभुषित आहे की अक्षरशत्रू आहे, शिष्टाचार-सभ्याचार पाळणारा आहे कि गांवढळ आहे, श्रीमंत आहे की गरीब आहे, त्याचा किंवा तिची पेहराव कसा आहे, कपडे किंमती आहेत की सो-सो आहेत, या वर मी करावी कां ? 
एखाद्या व्यक्ति संबधी माझे मत वर्तमानपत्रामध्ये तिच्या संबधी प्रसिद्ध होणा-या छापील बातम्या, पुस्तक, मासिक यातील लेख, दिवसाचे २४ तास धुमाकुळ घालत असलेल्या टीव्ही चॅनेल्स, सोशल नेटवर्कवर फिरून फिरून प्रक्षेपित केले जाणारे फोटो, व्हिडीओ क्लिप, चर्चा, कॉमेंटस्, तज्ज्ञ्यांच्या मुलाखती या व अशा गोष्टीवर मी ठरवावे कां? 
एखाद्या व्यक्तिबद्दल समज-गैरसमज मी त्याचे मूळ स्थान कोणते आहे, तो स्वकीय आहे की परकीय आहे, शत्रू देशातील आहे कि मित्र देशातील आहे यावर करणे योग्य आहे कां? 
मला विचारात पडलेला पाहुन माझ्या मनांतील तो कोपरा मला म्हणाला, 

"राजा, कांही प्रश्न असे असतात, उत्तर त्यांचे नसते शोधायचे; 
होऊन अंतर्मुख विवेकाच्या कसोटीवर ते असते जाणायचे"
त्यामुळे मी विचारलेल्या प्रश्नाचे समर्पक उत्तर जाणण्यास तुला मदत व्हावी, या उद्देशाने दोन हजार वर्षांपूर्वी एका महान विद्वान व्यक्तिने लिहीलेला एक श्लोक तुला सांगतो.
यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते, निघर्षणच्छेदनतापताडनैः ।
तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते, श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा ॥ -२
याचा भावार्थ ज्याप्रमाणे सोन्याची पारख घासून, तोडून, गरम करून, आणि ठोकून केली जाते. त्याप्रमाणे माणसाची पारख विद्या, शील, गुण आणि कर्मांच्या आधारे केली जाते. 
याच धर्तीवर असे म्हणता येईल, 
नाही जात-धर्मावर, नाही वंश-कुळावर, नाही रूप-संपत्तीवर;
करावी माणसाची पारख विद्या, शील, गुण, कर्म व निर्मळ अंतरंगावर !

ऐवढे बोलून माझ्या मनातील 'तो' कोपरा आपल्या नेहमीच्या जागी परतला. पण जाताना एकाद्या व्यक्तिची पारख कशी करावी यावर विचार करायला मला भाग पाडून गेला. 
आजचे अंतरंगाचे बोल इथे पूर्ण
१. ब्लॉग लेखिका, 
२. चाणक्य निती - आर्य चाणक्य