| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ जुलै २०२४
इंदिरानगर झोपडपट्टीनजीक लघुशंकेला थांबलेल्या दोघांवर कोयत्याने हल्ला लुटणाऱ्या श्रीकृष्ण ऊर्फ गोट्या शंकर कलढोणे (वय २४, रा. इंदिरानगर), विशाल मुरारी निशाद (वय २३, रा. ५ वी गल्ली, विठ्ठलनगर, सांगली) आणि राकेश शिवलिंग हदीमणी (वय २४, रा. इंदिरानगर झोपडपट्टी) या तिघांना अटक केली.
अधिक माहिती अशी, फिर्यादी अरबाज जमादार (वय २४, रा. ओंकार कॉलनी, हनुमाननगर) आणि त्यांचे मित्र नीलेश, परवेज हे दि. १५ जुलै रोजी पटेल चौक येथे असलेली रॅली संपवून रात्री घरी निघाले होते. इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील पडका बंगला येथे मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास ते लघुशंकेला थांबले होते. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी कोयत्याचा धाक दाखवला. अरबाज आणि नीलेश यांच्यावर कोयत्याने वार केले. जबरदस्तीने त्यांच्याकडील दोन मोबाईल आणि २ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील बाली हिसकावून घेऊन पलायन केले होते. अरबाज याने याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दरम्यान, संशयित हल्लेखोर धामणी रस्त्यावरील एका हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेत बसले असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून श्रीकांत कलढोणे व विशाल निशाद या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी इंदिरानगर येथील चोरीची कबुली दिली. तसेच तिसरा साथीदार राकेश हदीमणी याचा सहभाग असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांकडून पाच मोबाईल, सोन्याची बाली असा मुद्देमाल जप्त केला.
विश्रामबागचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे, उपनिरीक्षक मारुती साळुंखे, निवास कांबळे, कर्मचारी संदीप साळुंखे, बिरोबा नरळे, संकेत कानडे, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, मुलाणी, अतुल खंडागळे, गजानन चव्हाण, उमेश कोळेकर, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांच्या पथकाने कारवाई केली.