yuva MAharashtra वारणा उद्भव योजनेसह जीर्ण जलवाहिन्या बदलण्याचा मुद्दा विधानसभेसाठी प्लस पॉइंट ठरणार !

वारणा उद्भव योजनेसह जीर्ण जलवाहिन्या बदलण्याचा मुद्दा विधानसभेसाठी प्लस पॉइंट ठरणार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ जुलै २०२४
गतसप्ताहात शुक्रवार ते मंगळवार निम्म्या सांगलीचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने 'कृष्णामाई उषाला कोरड घशाला' अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक नागरिकांनी बोरिंगचा, तर काहींनी वॉटर एटीएम चा सहारा घेतला. हिराबाग कॉर्नर येथील जलवाहिनी फुटल्याने ही पाणीबाणीचे संकट निर्माण झाले होते. 

या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची माहिती घेतली असता, गावठाण भागातील निम्म्याहून अधिक जलवाहिन्या या पन्नास वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे वारंवार या जलवाहिन्यांना गळती लागण्याच्या घटना घडत असतात. याचा मनःस्ताप नागरिकांना होत असतो. यंत्रणेचीही धावपळ होते. त्यामुळे अशा जुन्या जलवाहिन्यांचे पुनर्जीवन केले गेले तर पूर्ण क्षमतेने जनतेला पाणी मिळू शकते. सांगलीच्या माळ बंगला येथील 56 एम एल डी चा प्रकल्पही कालबाह्य झाला आहे. तेथून पूर्ण क्षमतेने शुद्ध पाणी होत नाही. या साऱ्यांचा परिणाम म्हणजे अनेकदा गाळयुक्त, अळी मिश्रित पाण्याचा पुरवठा झाल्याने, नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागले होते.

सांगली मिरज कुपवाड शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या या जलवाहिन्यांनी तब्बल 900 किलोमीटर अंतर व्यापले आहे. यामध्ये निम्म्याहून अधिक जलवाहिन्या 50 वर्षांपूर्वीच्या आहेत. सध्या वारणा उद्भव योजनेतून पाणीपुरवठा करण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या दरबारी, याबाबतची फाईल मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, ही योजना मंजूर झाल्यास सांगलीकरांसह मिरज व कुपवाड येथील नागरिकांना शुद्ध नियमित पाणीपुरवठा होऊ शकतो.


आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही योजना मंजूर करून आणण्याचे जबाबदारी स्थानिक आमदारांची असून, यासाठी पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे व सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आपले वजन खर्च केले, तर हा त्यांच्यासाठी निवडणुकीचा प्लस पॉईंट ठरू शकतो. तसेच निवडणूक रिंगणात असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या गॉडफादरच्या माध्यमातून राज्य शासनावर दबाव आणण्यात यश मिळवले तर, हा त्यांच्यासाठी प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. आता यामधील कोण बाजी मारते, हे येणाऱ्या काळात दिसून येईल.