Sangli Samachar

The Janshakti News

महापुरामुळे होणाऱ्या वित्तीय नुकसानीपासून रक्षण करणाऱ्या 'वॉरियर्स'चा 'ऋणनिर्देश सन्मान' !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ जुलै २०२४
2019 आणि 2021 च्या 'होत्याचे नव्हते करणाऱ्या महापुरामुळे' सांगली, मिरज शहरासह नदीकाठच्या नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. विशेषतः व्यापारी आणि शेतकरी यामध्ये मोठ्या प्रमाणावर भरडला गेला. झालेल्या नुकसानी पासून सावरण्यासाठी, सर्वांनाच मोठा कालावधी जावा लागला. नुकतेच कुठे गाडी रुळावर येतीये असे वाटतानाच, यंदा पुन्हा एकदा कृष्णामाईने रौद्ररूप दाखवण्यास सुरुवात केली. सर्वांचे धाबे दणाणले. नदीकाठच्या लोकांना 'राहते घर' सोडून, 'आसरा' शोधावा लागला. यामध्ये नेहमीप्रमाणेच नागरिकांचे हालही झाले.

हे सारे घडत असताना, महाराष्ट्रातील शासन, प्रशासन कर्नाटकच्या शासनाशी समन्वय साधून, महापुरामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रयत्नशील होते. यामध्ये कोल्हापूरचे खा. शाहू महाराज आ. सतेज पाटील तसेच खा. विशाल पाटील, माजी मंत्री व आ. विश्वजीत कदम यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा पाटबंधारे मंत्री शिवकुमार यांच्याशी सातत्याने संपर्क साधून, कोल्हापूर सांगलीच्या महापुराला जबाबदार असणाऱ्या अलमट्टी धरणातून निसर्गाचे योग्य नियोजन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पण त्याचबरोबर आणखी काही मंडळी होती, जी महापूर आल्यानंतर नव्हे, तर तत्पूर्वी जवळजवळ पाच-सहा महिने यासाठी झटत होती. आणि ही मंडळी म्हणजे 'कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीचे कोअर कमिटी सदस्य'. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पाटबंधारे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून, या महापुराबाबत धोक्याची सूचना देत होते. आणि काय नियोजन करायला हवे, याचा उपायही देत होते. 


पण ही मंडळी इथेच थांबली नाहीत. तर कर्नाटकच्या पाटबंधारे आणि अलमट्टी धरणाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून, धरणात योग्य पाणी पातळी ठेवली नाही तर याचा सांगली कोल्हापूर जिल्ह्यावर किती मोठा परिणाम होऊ शकतो, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. इतकेच नव्हे तर त्याचवेळी प्रिंट आणि डिजिटल प्रसार माध्यमांच्या माध्यमातून महापुराचा हा धोका जनतेच्याही नजरेस आणून देत होती. त्यामुळे एक प्रकारचा दबाव शासन प्रशासनावर निर्माण झाला होता. याचाच परिणाम म्हणजे अलमट्टी धरणाचा योग्य प्रमाणातील विसर्ग. परिणामी पंचगंगा नदीमुळे कोल्हापुरात हाहा:क्कार उडाला असला तरी, सांगलीकर मात्र त्या दृष्टीने नशीबवान ठरले. त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या घटनांमधील एक असलेल्या 'कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समिती'च्या काही सदस्यांचा अरिहंत कॉलनीतील नागरिकांनी शाल व श्रीफळ देऊन 'ऋणनिर्देश सन्मान' केला. यामध्ये श्री. विजयकुमार दिवाण, श्री. सर्जेराव पाटील, श्री. प्रभाकर केंगार, श्री सुयोग व्हावळ, श्री प्रदीप वायचळ, श्री विलास चौथाई, श्री संजय कोरे यांचा समावेश होता.

यावेळी श्री. प्रभाकर केंगार व इतर सदस्यांनी महापुरा बद्दल सविस्तररित्या तांत्रिक माहिती उपस्थितांना दिली. आणि यापुढे महापुराच्या नुकसानीपासून वाचायचे असेल तर काय उपाय योजना करावे लागतील याचीही सविस्तर माहिती दिली. यावेळी कॉलनीतील सदस्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की, या कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या सदस्यामुळे आमचे मोठे संभाव्य नुकसान टळले आहे. यापुढे महापुरामुळे कोणाचेच नुकसान होऊ नये, यासाठी महापूर कृती समितीच्या बरोबरीने कार्यात सहभागी होऊ, समिती सदस्यांनी साद दिल्यानंतर आम्ही तात्काळ प्रतिसाद देऊ, अशा भावना व्यक्त केल्या.

कृष्णा महापौर नियंत्रण नागरी कृती समितीमध्ये 221 सभासद असून बारा लोकांचे कोर कमिटी आहे. या कोअर कमिटी मध्ये श्री. विजयकुमार दिवाण, श्री. प्रभाकर केंगार, श्री. सर्जेराव पाटील, श्री. प्रदीप वायचळ, श्री. प्रदीप माने, श्री. दिनकर पवार, सौ. प्राची गोडबोले, श्री. स्वप्निल कोळी, श्री. शिवकुमार पाटील, श्री. हनुमंत पवार, श्री. वसंत भोसले, आणि श्री. संजय कोरे यांचा समावेश आहे.