| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १३ जुलै २०२४
पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशातील एक लोकप्रिय योजना आहे. ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. विविध समस्यांची सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून मिळणाऱ्या अर्थसह्यामुळे मोठा दिलासा मिळत असतो. ही स्कीम 2019 मध्ये सुरू झाली होती. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकूण 3 समान हप्त्यांमध्ये वितरित केले जात आहेत. आतापर्यंत या योजनेचे 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
सतरावा हप्ता लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. अशातच आता या योजने संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेची लोकप्रियता पाहता आता सरकार या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवणार असा अंदाज आहे. यामुळे पीएम किसानच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महागाईने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना केंद्राच्या या निर्णयामुळे नक्कीच मोठा आर्थिक फायदा होणार आहे. पीएम किसान सन्मान निधीतील रक्कम आता 30 टक्क्यांनी वाढवली जाणार असा दावा केला जात आहे. या योजनेची रक्कम आता 80,000 कोटी रुपये एवढी केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत कृषी प्रतिनिधींनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांच्याकडे या योजनेची रक्कम प्रति शेतकरी दोन हजार रुपयांनी वाढवली गेली पाहिजे अशी मागणी आहे. सध्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत मात्र ही रक्कम 8,000 रुपये करण्याची मागणी केली जात आहे. त्यानुसार या योजनेतील रक्कम वाढवली जाऊ शकते असे म्हटले जात आहे. यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांचे येत्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून आहे. अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेची रक्कम वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.