| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ जुलै २०२४
माधवनगर रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही नव्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येऊ नये, अशी मागणी सांगलीसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या गावातील विविध संघटनांनी जिल्हाधिकारी व रेल्वे प्रशासनाकडे केली होती. विरोध डावलून जर काम सुरू केले, तर ते बंद पाडण्याचा इशाराही दिला होता.
पण रेल्वे प्रशासनाने या मागणीला केराची टोपली दाखवीत, जुना बुधवार रस्त्यावरील पंचशील रेल्वेच्या कामास सुरुवात केली असून, शनिवारी येथील वाहतूक वळवण्यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आधीच रस्ता चिंचोळा, त्यात वाहतुकीतील बेशिस्तपणा, यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असते. अशातच आता या ठिकाणी चिंचोळ्या मार्गावरील अर्धा रस्ता कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या सेतू भारतम् अंतर्गत जुना बुधगाव मार्गावरील पंचशील नगर रेल्वे क्रॉसिंग नंबर 129 गेट येथे उड्डाणपूल होत आहे. माधवनगर रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला 15 ऑगस्ट डेडलाईन दिली असली तरी, कामाचा वेग पाहता, तत्पूर्वी हा मार्ग पूर्ववत सुरू होईल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जुना बुधवार रस्ता हा नागरिकांना सोयीस्कर होता.
मध्यंतरी अवजड व चार चाकी गाड्यांना हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असला तरी, दुचाकी वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. आता रेल्वे ऑनलाईन पुलाच्या संभावित कामामुळे ही डोकेदुखी अधिक वाढणार आहे. आता इशारा दिलेल्या संघटना प्रमुख काय पाऊल उचलतात, यावर रेल्वे उड्डाणपूल काम व नागरिकांचे हाल अवलंबून राहणार आहे.