| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ जुलै २०२४
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळवण्यात भाजपला अपयश आले होते. आणि याचे सारे खापर या निवडणुकीची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले गेले. देवेंद्र फडणवीस यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडेही त्याने आपली ही इच्छा बोलून दाखवीत आपल्याला या पदांतून मुक्त करावे आणि पक्षासाठी काम करण्याची संधी द्यावी असे सांगितले. परंतु देवेंद्र फडणवीस यांची आगामी विधान सभा निवडणुकीसाठी असलेली गरज लक्षात घेऊन केंद्र नेतृत्वाने त्यांना यापासून परावृत्त करीत, उपमुख्यमंत्री पदावर कायम ठेवले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडी प्रमाणेच महायुतीतही सारे काही अलबेल नाही. महायुतीतील घटक पक्षानी विशेषतः एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देऊ केलेल्या जागांवर असमाधान व्यक्त करीत जादा जागांवर हक्क सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत भाजपच्या पाचही जागांवर उमेदवार निवडून आणीत, 'टायगर अभी जिंदा है' याची चुणूक दाखविली.
सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ती, फडणवीस यांच्या मॅजिक पॅटर्नच्या हॅट्रिकची... 10 जुन 2022 ला राज्यसभा तर 20 जुन 2022 ला विधानपरिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला मॅजिक पॅटर्न दाखवला होता. 2022 च्या निवडणुकींचे मुख्य सुत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. यामुळे यंदाही या मतदानाच्या मॅजिक पॅटर्नची संपुर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच देण्यात आली होती. 2022 च्या धक्कादायक निकालांचा मॅजिक पॅटर्न फडणवीसांनी पुन्हा एकदा खरा करून दाखवला. 2022 ला राज्यसभा आणि विधानपरिषदेत विजयानंतर आज फडणवीसांनी विजयी हॅट्रिक मारली आहे. विधानपरिषेदेच्या गणितांमध्ये फडणवीसांची बेरीज सर्वांवरच भारी पडलेली दिसतेय. सलग 5 टर्म आमदार असणाऱ्या शरद पवार पुरस्कृत उमेदवाराला फडणवीसांकडून धोबीपछाड देत, आपली चाणक्यनीति सिद्ध केली आहे.