| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ जुलै २०२४
कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी त्यातील मतदारांना आकर्षित करावे लागते. पूर्वीप्रमाणे आता पक्षाच्या चिन्हावर किंवा स्वतःच्या इमेजचा फायदा या निवडणुका जिंकण्यासाठी होईलच याची शाश्वती देता येत नाही. आणि म्हणूनच मतदारांसाठी आपण 'काय काय' केले याचा जाहीरनामा सादर करावा लागतो. इतकेच नव्हे तर समस्या शोधून त्याबाबत तक्रार येण्याची वाट न पाहता, त्याचा निपटारा करावा लागतो. प्रसंगी यासाठी स्वतःचे वजन व पैसा खर्च करावा लागतो. तर त्याचा राजकीय लाभ घेता येतो.
आणि सध्या सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमधील मतदारांना येतो आहे. त्यांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मतदारांच्या समस्या काय आहेत याची यादी इच्छुक उमेदवारांच्या कार्यालयात पोहोच होत असून, त्या सोडवण्यासाठी इच्छुकांची धावाधाव सुरू आहे. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे, मतदारांच्या प्रत्यक्ष संपर्कातील एक घटक म्हणजे 'रिक्षा चालक-मालक'... राजकारणातील चाणक्य, दिवंगत नेते, ॲड. व्यंकाप्पा पत्की हे दिवंगत माजी आमदार, बिजलीमूल्ल पै. संभाजी आप्पा पवार यांचे संकट मोचक. एका निवडणुकीत रिक्षा चालक ही आमची प्रचार यंत्रणा असल्याचे सांगितले होते. आणि सध्या हेच रिक्षा चालक-मालक संकटाच्या गर्दीत सापडले आहेत.
शासनाकडून लादलेला परवाना विलंब शुल्क अन्यायकारक असल्याच्या मुद्द्यावरून, रिक्षा चालक रस्त्यावर उतरला आहे. आणि त्यांच्या मदतीसाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या पृथ्वीराज बाबा पाटील, पै. पृथ्वीराज पवार आणि विद्यमान आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी ही समस्या हेरली नसती तरच नवल.
ही समस्या पहिल्यांदा हेरली ती आगामी विधानसभा निवडणुकीतील बलाढ्य उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांनी. जिल्ह्यातील एका बलाढ्य रिक्षा संघटनेतील मदतीला ते धावले. या रिक्षा संघटनेने केलेल्या आंदोलनात ते आघाडीवर दिसले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून शासनाला त्यांनी 'कडक' इशाराही दिला. त्यांच्यानंतर मुंबईत साक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात पोहोचले ते, पै. पृथ्वीराज पवार. त्यांनी फडणवीस यांच्याकडून शब्द घेतला रिक्षा चालक मालकांच्या वर अन्याय होऊ देणार नाही.
पण विद्यमान आमदार सुधीर दादा गाडगीळ या दोघांवर कडी करत हा निर्णय स्थगित करण्याचा आदेशच घेऊन सांगलीत दाखल झाले. आणि आता ही समस्या केवळ आमच्यामुळे सुटली असल्याचे मार्केटिंग केले जाणार हे नक्की. रिक्षा चालक-मालक म्हणताहेत 'कुणाच्या का कोंबड्याने असेना, उजाडलं तर खरं !'