yuva MAharashtra आमदार काँग्रेसचे, मंत्री भाजपचे... राजकारणाची ऐसी तैशी...

आमदार काँग्रेसचे, मंत्री भाजपचे... राजकारणाची ऐसी तैशी...


| सांगली समाचार वृत्त |
भोपाळ - दि. ९ जुलै २०२४
सध्या राजकारणात कुठे, कधी, काय घडेल हे सांगता येत नाही. आणि लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतरही भाजपा यापासून धडा घ्यायला तयार नाही. याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशात घडले आहे. 

मध्यप्रदेश भाजपाने काँग्रेसचे आमदार रामनिवास रावत यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. रावत हे ही ऑफर स्वीकारत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात डेरेदाखल झाले. परंतु मंत्रिपदाची शपथ घेत असताना, विजयपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या रावत यांना राज्यपालांकडून मंत्रिपदाची शपथ ही देण्यात आली. त्यामुळे आमदार काँग्रेसचे आणि मंत्री भाजपचे अशी परिस्थिती मध्य प्रदेशात निर्माण झाली आहे.


वास्तविक सरकार आणि विरोधक परस्पराचे राजकीय शत्रू असतात ही आपली परंपरा. परंतु सध्या या परंपरेला छेद देण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र पटवारी यांनी, भाजपा लोकशाही आणि संविधानाचा अपमान करीत असल्याचे म्हटले आहे. इकडे काँग्रेसचा उमेदवार म्हणून निवडून दिलेले विजयनगर मधील मतदारही हात चोळीत बसले आहेत. आता युद्धात आणि प्रेमात सारं काही क्षम्य असतं असं म्हणत असताना, राजकारणातही सारं काही क्षम्य असतं असं म्हणण्याची वेळ आली आहे.