yuva MAharashtra मनपा विकास योजनेतील रस्ते, रिंगरोड विकसित करण्याची खा. पाटील यांची सूचना !

मनपा विकास योजनेतील रस्ते, रिंगरोड विकसित करण्याची खा. पाटील यांची सूचना !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जुलै २०२४
महापालिकेच्या विकास योजनेतील (डेव्हलपमेंट प्लॅन) रस्ते, विस्तारित भागातील रिंगरोड विकसित करा. बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न, समस्या प्राधान्याने सोडवा, असे निर्देश खासदार विशाल पाटील यांनी महापालिकेतील बैठकीत दिले.क्रेडाई सांगली या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांवर महापालिकेत बैठक झाली. 

खासदार विशाल पाटील, महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त शिल्पा दरेकर, विविध विभागांचे अधिकारी, क्रेडाई सांगलीचे अध्यक्ष जयराज सगरे, राज्य सहसचिव रवींद्र खिलारे, माजी उपाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सांगली सचिव दिलीप पाटील, खजिनदार इम्रान मुल्ला, उपाध्यक्ष आनंदराव माळी, सहसचिव धवल शहा, समन्वयक उत्तम आरगे, संचालक सुरेश केरीपाळे यांच्यासह सत्तरहून अधिक क्रेडाइचे सांगली सदस्य उपस्थित होते.


क्रेडाईचे अध्यक्ष सगरे यांनी प्रलंबित डीपी नकाशे, विकास योजनेतील प्रस्तावित रस्त्यांचे प्रत्यक्ष जागेवर आरेखन, प्रमुख चौक विकसित करणे, शहर विकास योजनेतील प्रमुख डीपी रोड व विस्तारित भागातील रिंगरोड विकसित करणे, महापालिका हद्दीपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्ते विकसित करणे, सिटीसर्व्हेसाठी लागणार्‍या एकूण खर्चाच्या 30 टक्के रकमेची तरतूद, महावितरणचे ट्रान्स्फॉर्मर बसवण्यासाठी मनपाच्या खुल्या भूखंडामधील जागा उपलब्ध करून देणे, विस्तारित भागामधील विशेषतः धामणी रोड, कोल्हापूर रोड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ड्रेनेज व्यवस्थेचा प्रश्न, बांधकाम परवाने, घरपट्टी, बांधकाम मंजुरी, पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी बीपीएमएस या ऑनलाईन प्रणालीचा वापर करताना येणार्‍या अडचणी, अपुरे तांत्रिक मनुष्यबळ, अतिरिक्त कागदपत्रांच्या मागणीबाबत समस्या मांडल्या.

क्रेडाई सांगली सदस्यांकडून वर्षाला 40 ते 50 कोटींचा महसूल महानगरपालिकेला मिळतो. त्यामुळे क्रेडाई सांगली सदस्यांच्या बांधकाम व्यवसायासंबंधित विविध अडचणी त्वरित सोडवाव्यात, अशी सूचना खासदार पाटील यांनी केली.आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, विस्तारित भागामधील विशेषतः धामणी रोड, कोल्हापूर रोड, नवीन कलेक्टर ऑफिस या परिसरांतील ड्रेनेज व्यवस्थेचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल. बांधकाम मंजुरी, पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी बीपीएमएस या ऑनलाईन प्रणालीसाठी तांत्रिक मनुष्यबळ नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच तांत्रिक कर्मचार्‍यांची नियुक्ती होईल. सांगली-मिरज रस्त्यावरील 7 किलोमीटर रस्ता सुशोभिकरण, प्रमुख चौकांचे विस्तारीकरण व सुशोभिकरण करण्यात येणार आहे.