yuva MAharashtra गैरसमजातून घडले सारे, प्रथम फोडली रिक्षा; मग केला उपचाराचा खर्च सारा !

गैरसमजातून घडले सारे, प्रथम फोडली रिक्षा; मग केला उपचाराचा खर्च सारा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली दि. १२ जुलै २०२४
गैरसमजातून घडलेली एखादी कृती, दोन व्यक्तीत, नात्यात इतकेच नव्हे तर दोन समाजात उभी फूट पाडू शकतात. अशा अनेक घटना आपण पहात, ऐकत, वाचत असतो. परंतु जेव्हा वस्तुस्थिती समोर येते, तेव्हा प्रकरण निवळते. पण ज्याप्रमाणे काचेवर पडलेला चरा किंवा फुटलेली काच पूर्ववत करता येत नाही, असेही अनेकदा घडते. असाच एक प्रकार नुकताच सांगलीत घडला.

तीन आसनी प्रवासी रिक्षासह अन्य वाहनावर आकारण्यात आलेला 'सरसकट विलंब शुल्क रद्द करावा' या मागणीसाठी गुरुवारी सांगलीत कडकडीत बंद सुरू होता. सकाळपासून एकही रिक्षा धावताना दिसत नव्हती, यामुळे बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यावेळी जयसिंगपूरहून एक रिक्षा सांगलीकडे येत होती. रिक्षात मागे महिला बसलेली दिसल्याने, मध्यवर्ती बस स्थानकासमोर उभारलेल्या रिक्षा चालकांचा वाटले की, सदर रिक्षा प्रवासी वाहतूक करीत आहे. आणि काहीही चौकशी न करता रिक्षावर हल्लाबोल केला. त्यावेळी रिक्षातील महिला व रिक्षाचालक आंदोलनकर्त्यांना वस्तुस्थिती सांगितली तेव्हा खरा प्रकार आंदोलकांच्या लक्षात आला 

हा बंद केवळ सांगली पुरता मर्यादित होता. आणि भिसे नामक जयसिंगपूर येथील रिक्षाचालक पत्नीसह आपल्या मुलीच्या उपचारासाठी सांगलीत घेऊन आला होता. ही वस्तुस्थिती समजल्यानंतर आंदोलनकर्त्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली. तोपर्यंत रिक्षाचे नुकसान तर झाले होतेच, पण रिक्षात बसलेल्या छोट्या मुलीच्या डोळ्यालाही इजा झाली होती. 


हा प्रकार भाजपचे युवा नेते पै. पृथ्वीराज पवार यांना समजला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची गर्दी हटवून, स्वतः सिव्हिलमध्ये घेऊन गेले. मुलीचे सिटीस्कॅन करावे लागणार असल्याचे लक्षात आल्यानंतर, ते सिटीस्कॅनही स्वखर्चाने करून दिले. यावेळी त्यांच्याबरोबर रिक्षा संघटनेचे पदाधिकारीही होते. यावेळी पुन्हा साऱ्यांनी भिसे यांची व त्यांच्या पत्नीची क्षमा मागितली. भिसे यांनीही मोठ्या मनाने साऱ्यांना माफ केले. शेवटी विलंब शुल्काची समस्या त्यांचीही होतीच की...