yuva MAharashtra ॲड. उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर युवराज कामटेची हरकत ! सरकारच्या निर्णयाकडे लक्ष !

ॲड. उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर युवराज कामटेची हरकत ! सरकारच्या निर्णयाकडे लक्ष !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ जुलै २०२४
'गुन्हेगारांचा कर्दनकाळ' अशी ख्याती असलेले ॲड. उज्वल निकम यांनी भाजपाच्या आग्रहास्तव राजकारणात पदार्पण केले. बहुचर्चित मुंबई उत्तर मध्य मतदार संघातून त्यांनी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत जोरदार लढत दिली. परंतु स्थानिक राजकारण आणि 'जातीचा टक्का' यामुळे कोर्टात अभावानेच अपयशाचा सामना करावा लागणाऱ्या ॲड. उज्वल निकम यांना येथे पराभवाचा सामना करावा लागला.

परंतु राजकारणातील त्यांचे पाऊल आता ॲड. निकम यांना नवीन डोकेदुखी ठरेल की काय ? अशी शक्यता निर्माण झाली आहे. सांगली येथील गाजलेल्या अनिकेत कोथळे खून प्रकरणातील मुख्य संशयित बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याने निकम यांच्या नियुक्ती बाबत हरकत घेतली असून त्याने कारागृहातून थेट जिल्हा व प्रधान न्यायाधीश पी. व्ही. जाधव यांना एका पत्राद्वारे हरकत घेतली आहे.

कामटे यांनी या पत्रात नमूद केले आहे की, ॲड. उज्वल निकम यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांचीओळख हेतू, विचार आणि अजेंडा यांनी बदललेली आहे. ते एका राजकीय पक्षाचे उमेदवार राहिल्याने त्यांच्या युक्तीवादात तटस्थता असणार नाही. त्यामुळेच त्यांचे कोथळे खून प्रकरणात पुन्हा केलेले विशेष सरकारी वकील पदाच्या नियुक्तीला कामटे याने हरकत घेतली आहे. परंतु कोर्ट व्यवस्थापनाने अथवा शासनाने याबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.

अर्थात ॲड. उज्वल निकम यांची नीतिमत्ता आणि व्यावसायिक कारकीर्द पाहिले की, असा कोणताही परिणाम त्यांच्या कोर्टातील कामगिरीवर होणार नाही, असा ठाम विश्वास न्यायिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी व्यक्त केलेला आहे. यापूर्वीही अनेक वकिलांनी राजकीय कारकीर्द गाजविली. परंतु त्याचा परिणाम आपल्या व्यवसायातील नीतिमत्तेवर होऊन दिला नाही. त्यामुळेच ॲड. उज्वल निकम यांच्या कोर्टातील कामकाजावरही ते कोणताही परिणाम होऊ देणार नाहीत.