| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. २० जुलै २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारने लोकप्रियता मिळवण्यासाठी अनेक योजनेतून मतदारावर खैरात वाटणे सुरू केले आहे. यावर विरोधी पक्षाने तर टिकेचा भडीमार केला आहेच, परंतु आता भाजपाचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत असून, त्यांनी व्यक्त केलेले मत शिंदे सरकारसाठी 'घरचा आहेर मानला जात आहे.'
वास्तविक नितीन गडकरींचा हा व्हिडिओ नेमका कधीचा ? यावर प्रश्नचिन्ह असले तरी त्यातील मुद्दा खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. यामध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, सरकारच्या पैशाने फुकट वाटल्याने राजकारण होत नाही. आपण रोजगार निर्माण करायला हवा, गरिबांना घरे बनवून द्यायला हवीत, स्वच्छता करायला हवी, कचरामुक्त देश ही संकल्पना राबवायला हवी. आपण नवी इंडस्ट्री आणायला हवी, लोकांना रोजगार निर्माण करून द्यायला हवा, हे लॉंगटर्म आणि पर्मनंट उपाय आहेत. यामुळे देशाचा, राज्याचा विकास होऊ शकतो. निवडणुका जिंकण्यासाठी केवळ अशा 'रेवडी' वाटल्याने देशाचंही नुकसान होईल, आर्थिक क्षेत्राचेही नुकसान होईल आणि समाजाचेही नुकसान होईल. जर फुकटचं काही मिळत असेल तर त्याची किंमत राहत नाही, असे नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे या व्हिडिओतून म्हटले आहे. मला वाटते लोकांना ज्याची जिथे गरज असेल, तिथे त्यांना जरूर सवलत द्यावी. परंतु अशा प्रकारची राजनीती निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून होत आहे, ती लोकशाहीला घातक आहे. असेही गडकरी यांनी म्हटले आहे.
नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेले भावना, खरोखरच राजकीय पक्षांच्या डोळ्यात अंजन घालणारी म्हणावी लागेल. सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा मतदारांच्या तोंडाला पाणी पुसणाऱ्या योजना देश हितासाठी घातक म्हणायला हव्यात.