| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ जुलै २०२४
केंद्र शासनाच्या 'स्वच्छता आपनाओ बिमारी भगाओ !' अभियाना अंतर्गत सांगली महापालिकेने येथील कर्मवीर चौकामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात तसेच नागराज कॉलनी, अभय नगर, आरोग्य केंद्र कुपवाड या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले. यावेळी सांगली शहरातील स्वच्छता प्रेमींनी संघटना व नागरिकांनी मोठा सहभाग घेतला.
लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सांगलीचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री ना. सुरेश भाऊ खाडे यांच्यासह महापालिका आयुक्त शुभम गुप्ता उपयुक्त वैभव साबळे तसेच इतर अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी 'एक पेड मॉं के नाम' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री ना. सुरेश भाऊ खाडे म्हणाले की, स्वच्छता महाअभियान हे सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने राबविले. परिसराची स्वच्छता केल्यानंतर आजार पळून जातील, यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने येथे झाड लावावे असाही उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बोलताना ना. सुरेश भाऊ खाडे म्हणाले की स्वच्छतेचे खूप फायदे असतात. आपले आयुष्य निरोगी ठेवायचे असेल तर स्वच्छताही महत्त्वाची आहे. केवळ व्यायाम केल्याने आरोग्य सुस्थितीत राहत नाही, त्याचबरोबर शरीराची व परिसराची स्वच्छता तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराप्रमाणेच, आपल्या परिसरातही स्वच्छता राखण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन ना. सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी केले.
मध्यंतरी महाराष्ट्र शासनातर्फे सांगली महापालिकेला ड्रेनेजची स्वच्छता करण्यासाठी एक रोबोट दिला आहे. याचा चांगला फायदा होत असून, ड्रेनेज स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहिले आहे. अनेक कर्मचाऱ्यांना ड्रेनेज स्वच्छ करताना आपले प्राणही गमवावे लागले होते, या रोबोट मुळे या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचल्याचा उल्लेख सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी केला.
ना. सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी सांगितले की, यापुढे काळात कचरा एक्झॉट करणाऱ्या गाड्या आम्ही घेत आहोत, ही गाडी शहराच्या विविध भागात फेरफटका मारणारा असून, एखाद्या ठिकाणी कचरा दिसला तर तो तात्काळ उचलण्यात येईल. याचा शहर सुंदर व स्वच्छ राहण्यासाठी उपयोग होणार आहे. असेही ना. सुरेश भाऊंनी सांगितले.
या स्वच्छता अभियानात सांगली शहरातील स्वच्छता प्रेमी संघटनांसह महापालिकेचे 2500 अधिक होऊन कर्मचारी या स्वच्छता अभियानामार्फत 280 टन कचरा उचलण्यात आला.