Sangli Samachar

The Janshakti News

पावसाची उसंत, कृष्णेचा रुद्रावतार शांत, धोका टळल्याने नागरिकांना दिलासा !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ जुलै २०२४
कोयनेसह सातारा सांगली धरण पाणलोट क्षेत्रात तसेच कृष्णा वारणा नदीच्या परिक्षेत्रात पावसाने उसंत घेतल्याने पूर परिस्थिती आटोक्यात आली आहे. गेल्या 24 तासात अवघे एक फूट पाणी वाढलेले नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दोन तीन तासात अवघा एखादे इंच पाणी वाढत आहे. कराड पासून भिलवडी पर्यंत तर पाण्याची पातळी थोडीशी कमी झाली आहे. त्यामुळे पावसाने अशीच मेहरबानी केली तर कृष्णा नदीकाठ निवांत होऊ शकतो. 

शनिवारी सांगलीतील आयुर्विन पुलाजवळील पाणी पातळी 40 फुटापर्यंत आल्यानंतर, नागरिकांची धडधड वाढली होती. 2019 चा कटू अनुभव पुन्हा पदरी येतो का, अशी भीती प्रत्येकाच्या मनात होती. दरम्यान महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने मदत कार्यात सुसुत्रता ठेवून नागरिकांना पूर क्षेत्रातून बाहेर पडण्याचे आवाहन केलेच परंतु त्यांच्या निवासाचे आणि इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या.


दरम्यान, कर्तव्याचा अनुभव लक्षात घेऊन यंदा एनडीआरएफची एक तुकडी शुक्रवारी रात्री सांगलीत दाखल झाली. शनिवारी दिवसभर या तुकडीने पूर क्षेत्राची पाहणी करून, नागरिकांना दिलासा दिला. सध्या 481 कुटुंबांतील 2042 लोकांना पूर क्षेत्रातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पालिकेच्या निवारा केंद्रात दाखल झालेल्या कुटुंबांची संख्या 55 असून त्यामध्ये 222 नागरिक आहेत या सर्वांना हिंदू मुस्लिम चौक येथील येथील मनपा शाळा नंबर 17, उर्दू शाळा, सह्याद्री नगर मधील मनपा शाळा नंबर 23 या ठिकाणी सर्वांचे सोय करण्यात आली आहे. तर स्वतः अन्यत्र स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची संख्या 426 असून त्यांची संख्या 1820 इतकी आहे.

सांगली शहरातील 99 जनावरांना स्थलांतरित करण्यात आले असून मिरजेतून 248 पैकी 42 जनवरी ग्रामीण भागातील निलजी बामणी येथील मार्केट यार्ड मधील उर्वरित 206 जनावरे मालकांनी स्वतःच्या जागेत स्थलांतरित केले आहेत मिरज येथील जनावरांना मनपा मार्फत चारा देण्याची सोय करण्यात आली आहे.

आज माजी मंत्री आ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून दिलासा दिला. आणि या संकट समयी आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. नागरिकांनी यावेळी त्यांच्यासमोर अडचणींचा पाढा वाचला, तेव्हा आ. कदम व खा. पाटील यांनी आगामी काळात सर्व अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले.