yuva MAharashtra महापुरापासून वाचण्यासाठी नागरिकांची तर त्यांना वाचवण्यासाठी नेत्यांची धावाधाव !

महापुरापासून वाचण्यासाठी नागरिकांची तर त्यांना वाचवण्यासाठी नेत्यांची धावाधाव !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जुलै २०२४
2019 आणि 2021 च्या प्रलयंकारी महापुराच्या कटू अनुभवामुळे प्रत्येक पावसाळ्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुराच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंचगंगा आणि कृष्णा कोल्हापूर व सांगली शहरासह नदी प्रवण भागातील अनेक गावांमध्ये प्रविष्ट होते. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांसह नुकसानीस सामोरे जावे लागते. आणि म्हणूनच यंदा हा अनुभव लक्षात घेऊन कर्नाटक सरकार व अलमट्टी धरण अधिकाऱ्याशी समन्वय ठेवण्यासाठी सांगली कोल्हापुर जिल्ह्यातील नेते मंडळींची धावाधाव सुरू आहे.

कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांची भेट घेतली परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव करून देत अलमट्टी आणि हे हिप्परगी धरणातील पाण्याचे नियोजन करावे याबाबत सूचना देण्याचे आवाहन आ. सतेज पाटील यांनी यावेळी केले.

याचवेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसण्याची भीती लक्षात घेऊन, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून किमान तीन लाख क्युसेसने पाणी विसर्ग सुरू करावा. संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने तातडीने एक उच्चस्तरीने समिती नेमावी आणि कर्नाटक मधील जलसंपदा खात्यांच्या अधिकाऱ्यात समन्वय ठेवावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय जल शक्ती मंत्रींना सी आर पाटील यांच्याकडे केली आहे.

दरम्यान पूर परिस्थिती बाबत खासदार विशाल पाटील हे ही आक्रमक झाले असून, बिहारला पूर परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी बक्कळ निधी दिला जातो, तसा महाराष्ट्राला का मिळत नाही ? अलमट्टी धरणाबाबत केंद्र सरकारने तात्काळ लक्ष घालून योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी खा विशाल पाटील यांनी केली आहे, सांगली जिल्ह्याचे काँग्रेस नेते आ. विश्वजीत कदम यांच्या समवेत त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आक्रमकपणे सांगली महापुराची परिस्थिती पत्रकारांसमोर मांडली आणि केंद्राने याबाबत पुढाकार घ्यावा अशी मागणी केली.

या पार्श्वभूमीवर सांगली व मिरज शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना धीर देण्यासाठी व त्यांना सुरक्षित स्थळे हलवण्यासाठी आ. सुधीर दादा गाडगीळ, सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पू डोंगरे, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, यांच्यासह अनेक नेत्यांचेही धावपळ सुरू आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, त्यांना सर्वंकष सुविधा पुरवणे यासाठी पक्षीय भेदाभेद विसरून सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.