Sangli Samachar

The Janshakti News

काँग्रेसचे 'हौसले बुलंद', मुख्यमंत्रीपदावर थेट ठोकला दावा ! राष्ट्रवादी ठाकरे गटात चुळबूळ !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ जुलै २०२४
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या आढावा संदर्भातील महत्त्वाची बैठक टिळक भवन येथील दादरच्या प्रदेश कार्यालयात नुकतीच पार पडली. यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडीच्या 180 जागा आरामात येऊ शकतात. आणि यामध्ये आपण थोरला भाऊ असू... त्यामुळे मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, अशी थेट घोषणा करून टाकली.

या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के.सी. वेणूगोपाल, राष्ट्रिय महासचिव मुकुल वासनिक, प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रांताध्यक्ष आ. नाना पाटोले काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. वर्षाताई गायकवाड, अविनाश पांडे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ यांच्यासह काँग्रेसचे अनेक बडे नेते उपस्थित होते.


बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालपर्यंत बिनधास्त सुरु आहे. महागाई, बरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, हे सर्व जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे. जनतेत महायुती सरकार बद्दल प्रचंड असंतोष असून, लोकसभेप्रमाणेच मतदार महाआघाडीला भरभरून मते देण्याच्या मनस्थितीत आहेत. यासाठी आपण महाआघाडीतील प्रत्येक घटक पक्षाला बरोबर घेऊन कोणतेही परिस्थितीत सत्तापालट करण्यासाठी एक संघपणे निवडणुकीला सामोरे जायचे आहे.

बाळासाहेब थोरात यांच्याप्रमाणेच काँग्रेस मधील वरिष्ठ नेत्यांसह उपस्थित आमदार व प्रमुख कार्यकर्त्यांनी महायुती विरोधातील खदखद बोलून दाखवली. त्याचबरोबर 'जेथे ज्यांची ताकद तेथे त्यांचा उमेदवार' हे सूत्र अवलंबण्याचे धोरण राबवण्याबाबत स्पष्ट मत मांडले. लोकसभेप्रमाणे विधान सभा निवडणुकीत जर एकमेकांच्या मनात शंका राहिली तर याचा फटका मतदानावर होऊ शकतो अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली.