yuva MAharashtra खा. विशाल पाटील यांनी सांगली महापालिकेत घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती !

खा. विशाल पाटील यांनी सांगली महापालिकेत घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ जुलै २०२४
खा. विशाल पाटील यांनी लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर सांगलीत येऊन आपल्या दबंग कामगिरीस सुरुवात केली आहे. काल त्यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. खा. पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता देता, महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.

यावेळी बोलताना खा. विशाल पाटील म्हणाले, एलईडी प्रकल्प व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात भानगडी असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. एलईडीचा करार एकतर्फी झाला असून यातून महापालिकेला भविष्यात फार फायदा होईल असे वाटत नाही. समडोळी तसेच बेडग रोडवरील कचरा डेपोतील साडेआठ लाख टन कचरा होता, तो अचानक दहा लाख टन कसा झाला ? यामुळे दीड लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे सुमारे सहा कोटी रुपये वाढले असून ते महापालिकेचे नुकसान असल्याचे सांगत खा. विशाल पाटील यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.


यावेळी बोलताना खा. विशाल पाटील म्हणाले की मी स्वतः एलईडी कराराचा अभ्यास करणार आहे. तसेच पालिकेच्या विधी विभागानेही यावर अभ्यास करून करारात दुरुस्ती करण्याचा अहवाल द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिका क्षेत्रात शासन निधीतून सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी खा. विशाल पाटील यांनी जुन्या प्रसुतीगृहाच्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या नवीन दवाखाना व व्यापारी संकुलाची तसेच वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हनुमान नगर येथील नियोजित नाट्यगृह तसेच अन्य कामांची माहिती घेतली.

अधिकारी सुनील पाटील यांनी वारणा उद्भव योजनेची माहिती दिली. ही योजना 293 कोटी रुपयांची असून, यामध्ये समडोळी येथून वारणा नदीतील पाणी माळ बंगला जवळील जलशुद्धीकरण केंद्रात आणणे, तसेच गावभाग यासह गावठाण भागात सुमारे 500 कि. मी. नवीन पाईपलाईन टाकणे, नवीन पाण्याच्या टाक्या बांधणे आदी कामांचा समावेश असल्याचे सांगितले. 


सांगलीची ड्रेनेज योजना 85%, तर मिरजेचे 95% पूर्ण झाली आहे तर कुपवाड भुयारी गटारी योजनेचे काम प्रगती पथावर असल्याचे त्यांनी सांगितले. शहराला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी सूरु असलेल्या उपाययोजनांची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

विद्युत अभियंता अमर चव्हाण यांनी एलईडी प्रकल्पाची माहिती दिली. समुद्रा कंपनीला हा ठेका दिला असून, या कंपनीने निविदाप्रमाणे 41 हजार 797 दिवे बसवले आहेत. आणखी सहा हजार दोनशे दिवे बसवण्याचे काम या कंपनीला देण्यात आले आहे. हा भारतातील पहिलाच प्रकल्प असून, यामुळे पालिकेच्या वीज बिलात बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले मात्र खा. पाटील यांनी या प्रकल्पातील बारकावे जाणून घेत, यातून महापालिकेला फारसा काही फायदा होणार नसल्याचे सांगत, यात ठेकेदाराचे अधिक हित असल्याचे ठणकावले. पालिकेने ठेकेदाराची केलेला करार एकतर्फी असल्याचे सांगत, त्यांनी हा करार बदलण्यासाठी कायदेशीर अभ्यास करण्याची सूचना केली. तसेच स्वतःही करार मागवत याचा अभ्यास करणार असल्याचे सांगितले.

नगररचनाकार काकडे यांनी महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्याचे नकाशे अद्याप शासनाकडे प्रलंबित असल्याचे सांगितले. आराखडय़ात 539 विविध आरक्षणे असून, यातील सांगलीत 256, मिरजेत 197 तर कुपवाडमध्ये 87 आरक्षणे असल्याची माहिती दिली. आतापर्यंत महापालिकेने केवळ 34 आरक्षणे विकसित केली असून सुमारे एक लाख 15 हजार चौरस मीटर टीडीआर दिला असल्याचे सांगितले. या टीडीआरमुळे महापालिकेने 105 कोटी रुपये वाचविले असून, टीडीआरची बाजारभावाने किंमत सुमारे 200 कोटी पेक्षा जास्त होते. यावेळी खा. पाटील यांनी पालिका क्षेत्राचा अधिक वेगाने विकास होणे आवश्यक असल्याचे सांगून, टीडीआर मागणी करण्यात येणार असल्याचे सांगत बांधकाम परवाने जलद गतीने देण्याचे सूचना केली.

आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत महापालिकेने समडोळी व बेडग रोडवरील कचरा डेपो साचलेल्या दहा लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया केल्याचे सांगितले. संबंधित ठेकेदार येथील कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण करीत असून त्याची विक्री आता सुरू झाली आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रात जमा होणाऱ्या रोजच्या सुमारे 220 टन कचऱ्यावर हे आता नियमित प्रक्रिया सुरू आहेत. त्यामुळे नवीन कचरा साठत नाही. यावर खा. पाटील यांनी निविदा साडेआठ लाख टन कचऱ्याची होती. मग दीड लाख टन कचरा कसा वाढला ? असा सवाल केला. रोज येणारा कचरा कोण मोजतो, कोणाच्या देखेरेखीखाली हे काम होते, खत विक्रीतून किती रक्कम मिळते ? महिन्यात 7000 टन कचरा साठत असेल तर त्यातून केवळ 1000 टनच खत कसे निर्माण होते ? उर्वरित साठ 60 टन कचरा कोठे जातो ? असे सवाल करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यात मोठ्या भानगडी असल्याच्या तक्रारी असून दीड लाख टन कचरा अतिरिक्त झाल्यामुळे पालिकेचे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे खा. पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रशासनास उत्पन्न वाढवा, खर्च कमी करा, गळती रोखा, डासापासून होणाऱ्या झाका व अन्य आजाराबाबत अलर्ट राहून नागरिकांत, विशेषतः गर्भवती महिलांमध्ये जागृती करा. मध्यवर्ती निदान केंद्रात सोनोग्राफी, एमआरआय आदि सुविधा निर्माण करून द्या. लोकांना चांगली सेवा द्या अशा सूचना केल्या.

खा. विशाल पाटील महापालिकेत आल्यानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले. अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, रवींद्र आडसूळ, उपायुक्त वैभव पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, खाते यावेळी प्रमुख उपस्थित होते.