yuva MAharashtra महायुतीच्या लाडकी बहिण योजनेला महाआघाडीची फाईट, वातावरण टाईट ?

महायुतीच्या लाडकी बहिण योजनेला महाआघाडीची फाईट, वातावरण टाईट ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जुलै २०२४
आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून महायुती आणि महाआघाडीने दंड थोपटले आहेत. त्या दृष्टीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचे जाळे तयार केले जात आहे. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून महायुतीने महिलांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना सादर केल्या त्यापैकीच एक... 'मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना' 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी झुंबर पाहता, महाआघाडीनेही कंबर कसली असून महिलांना आकर्षित करण्यासाठी त्याहीपेक्षा मोठी रक्कम देण्याची योजना आखली आहे. मध्यंतरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महा आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महिलांना दीड लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते.


विरोधकांनी या घोषणेचे वारे काढले. महिला मतदारांची संख्या पाहता इतकी मोठी रक्कम देणे शक्य आहे का आणि महाआघाडीने त्यासाठी कुठून निधी उभा करणार आहे हे जाहीर करावे, असे आव्हान विरोधकांनी चव्हाण यांना दिले होते. पण महाआघाडीने त्यावर काही प्रतिक्रिया दिली, ना पृथ्वीराज चव्हाण यांनी. परंतु प्रकरण तिथेच निवळले. लोकही विसरून गेले.

परंतु आता महायुतीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस मिळणारा प्रतिसाद पाहता, यावर 'ठोशास ठोसा' दिला नाही, तर महिला मतदार महाआघाडीपासून दूर जातील अशी भीती वाटत आहे. याचमुळे महाआघाडीच्या वरिष्ठ नेत्याने याबाबत नव्याने चाचणी करण्यास सुरुवात केली असून, ' मुख्यमंत्री लाडके बहीण' योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेपेक्षा ही रक्कम अधिक असेल असे सूत्रांकडून समजते.


महायुतीने आणलेली 'लाडकी बहिण योजना' महिला मतदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची टीका समाज माध्यमातून होत असतानाच महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही यावर तोंडसुख घेतले. परंतु आता महायुतीच्या दोन पावले पुढे जात नवी योजना आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आल्यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे... त्यामुळेच महाआघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी सबुरीचा सल्ला दिला असल्याची माहितीही समोर येत आहे...

आणि याचमुळे महायुतीच्या 'लाडकी बहिण योजनेला'ला महाआघाडीची फाईट, वातावरण टाईट... अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे !