| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जुलै २०२४
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कृष्णा खोऱ्यातील महापूर नियंत्रणासाठी सद्बुद्धी दे असे साकडे आज सांगलीकर नागरिकांच्या वतीने सांगलीचे आराध्य दैवत श्री गजाननाला घालण्यात आले. कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने सांगलीतील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरासमोर हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी आरती हे करण्यात आली.
सांगली कोल्हापूरसह कृष्णा खोऱ्यातील महापूर नियंत्रणात आणणे किंवा मुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याच हातात आहे. ना. एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा केला, तर सिद्धरामया अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवू शकतात. त्यामुळे या दोघांना असे प्रयत्न करण्याची ही सद्बुद्धी द्यावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा नगरीसह सर्व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच मुक्त क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगेने धोक्याची पातळी गाठली आहे. तर वारणा त्याच मार्गावर आहे. कृष्णा नदीचई पातळीही सातत्याने वाढत आहे यामुळे सांगलीसह मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, कवठेपिरान, भिलवडीसह वाळवा, शिराळा तालुक्याच्या टोकापर्यंत भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथून पाण्याचा विसर्ग वाढवावा. किमान तो साडेतीन लाख केसेस करावा, अशी मागणी समितीतर्फे वारंवार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनाही तसे निवेदन पाठविण्यात आले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कृष्णा खोऱ्यात महापूर येऊ नये म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याचे आदेश द्यावेत अशी नागरिकांची मागणी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्नाटक बरोबर सातत्याने समन्वय ठेवून ना. सिद्धरामय्या यांना अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यासाठी सतत आग्रह धरावा, अशी प्रार्थना श्री गणेशा समोर करण्यात आली. अलमट्टी धरणातील निसर्ग वाढविल्याशिवाय कृष्णा वारणा पंचगंगा या नद्यांचे पाणी कमी होणार नाही. पाऊस असाच वाढत राहिला तर 100% महापौर येणार आहे असा इशारा यावेळी देण्यात आला. या अनोख्या आंदोलनात श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी आलेले, नागरिक तसेच परिसरातील विविध व्यावसायिक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, सुयोग हावळ, मोहन जामदार, नंदकुमार कापसेकर, आप्पा पाटणकर, गजानन चव्हाण, प्रमोद गायकवाड, अनिल पठाडे, शांताराम कदम यांच्यासह नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.